Bull Attack Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ फार मजेशीर असतात तर काही फारच भयानक असतात, जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चवताळलेला बैल भररस्त्यात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करतो. या हल्ल्यात तो व्यक्तीला ज्याप्रकारे दुखापत करतोय, ते पाहताना तुमच्याही काळजाचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही घटना दिल्लीतील छतरपूर भागात घडल्याचे सांगितले जातेय.
नेमकी घटना काय?
रस्त्याच्या कडेला स्कुटीजवळ एक वयोवृद्ध माणूस आरामात उभा होता. यावेळी एक चवताळलेला बैल तिथे आला आणि पुढच्याच क्षणी त्याने व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक वयोवृद्ध लाल रंगाच्या स्कुटीजवळ उभे असल्याचे दिसून येतेय. यावेळी अचानक एक चवताळलेला बैल त्यांच्या दिशेने धावत येतो व वयोवृद्धाला थेट शिंगांनी हवेत उचलतो आणि रस्त्यावर लोळवतो, यानंतर शिंगांनीच त्यांना रस्त्यावरून दूरपर्यंत फरफटत नेतो. इतकंच नाही तर तीक्ष्ण शिंगांनी त्यांना भोसकण्याचा प्रयत्न करतो, पायांनी अंगावर उड्या मारत त्यांना गंभीररीत्या जखमी करतो. चवताळलेला बैल असे वारंवार करत राहिला. बैलाचे हे आक्रमक वर्तन पाहून जवळील लोक घाबरून ओरडू लागले. यादरम्यान बैलही रस्त्यावर कोसळतो पण तो पुन्हा उठून हल्ला करु लागतो.
यावेळी रस्त्यावरील कुत्रे आणि काही महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बैल इतका संतापलेला होता की त्याने त्या महिलांनाही जोरात धडक देत खाली पाडले. अखेर काही लोक काठ्या आणि रॉड घेत धावले आणि त्यांनी बैलाला हुसकावले. अशाप्रकारे काही लोकांमुळे वयोवृद्धाची त्या बैलाच्या तावडीतून सुटका होते.

https://twitter.com/Arhantt_pvt/status/1929873508139467106
व्हिडीओच्या शेवटी लोक जखमी वयोवृद्धाला उचलून बाजूला नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि लोक महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत की, भटक्या बैलांना कधी आळा बसणार?
बैलाचा जीवघेणा हल्ला (Delhi Bull Attack)
बैलाच्या या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत अनेकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर लोकांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, प्रशासनाने भटक्या प्राण्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
एका युजरने लिहिले की, लाल रंग पाहून बैल चवताळला असे दिसते; तर दुसऱ्याने म्हटले की, दिल्लीत भटक्या बैलांची एक मोठी समस्या बनत आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहरी भागात भटक्या प्राण्यांची समस्या किती गंभीर झाली आहे हे अधोरेखित केले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनाने या दिशेने ठोस पावले उचलली पाहिजेत.