सध्या सगळीकडे चर्चा आहे ती एका व्हायरल व्हिडीओची. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळयांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मनाला भिडणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते कधी नकळत डोळ्यांत पाणी आणतात; तर कधी चेहऱ्यावर हसू. कधी कधी दोन प्राण्यांमध्ये नेमकी कोण कोणाची शिकार करणार याची उत्सुकता ताणणारा थरारही पाहायला मिळतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे ती एका हत्तीच्या अपघाताची.

या व्हिडीओतून दिसतेय की, रेल्वेमार्गावर फिरत असलेल्या हत्तीवर धावत येणारी एक्स्प्रेस ट्रेन धडकली आणि त्यामुळे जखमी झाल्यामुळे वेदनाग्रस्त होऊन तो कोसळला. हत्ती रेल्वे रुळांवरून फिरत होता आणि त्याच वेळी वेगाने ट्रेन आली आणि तिने हत्तीला जोरदार धडक दिली. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या अपघाताचा हा व्हिडीओ ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सोशल साइटवर ‘@SageEarth’ नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यांच्या कॅप्शनमध्ये १० जुलैच्या संध्याकाळी ‘कांचनजंगा एक्स्प्रेस’ ट्रेन व हत्ती यांच्यात टक्कर झाली. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील सियालदह ते आगरतळादरम्यान धावते, असे नमूद करण्यात आले आहे. १.४० मिनिटांच्या या क्लिपच्या सुरुवातीला हत्ती रेल्वे रुळांवरून उठण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

हा हत्ती खूप गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यामुळे अनेक वेळा जोर लावूनही तो मागच्या पायावर उभा राहू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो; पण त्याचे पाय अडकत असल्याने तो पुन्हा पडतो. त्यानंतर जखमी हत्ती पूर्ण शक्ती एकवटून स्वतःला ओढत नेऊन रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतो; पण काही केल्या त्याला पुढे जाणे शक्य होत नाही आणि अचानक तो रुळांवर पाठीवर पडतो. त्यानंतर काही काळ तो पुन्हा आपले हात-पाय हलवतो आणि मग त्याचे पाय लटके पडतात. नंतर त्या बिचाऱ्या मुक्या जनावराच्या विशाल शरीराची कोणतीही हालचाल दिसून येत नाही.

हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या हॅण्डलने कमेंट बॉक्समध्ये दावा केला आहे की, ही जगीरोड जवळील घडलेली पहिली घटना नाही. हॅण्डलच्या म्हणण्यानुसार, “याआधीही अशाच परिस्थितीत दोन हत्तींचा मृत्यू झाला होता. हा भाग हत्ती वावरत असलेल्या क्षेत्राचा भाग नाही. त्यामुळे आता अशा भागात हत्तींची संख्या किती आहे हे शोधण्याची वेळ आली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून, चार लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. या मुक्या प्राण्याच्या मृत्यूने लोक दु:खी झाले आहेत. या निरपराध हत्तीचा जीव वाचवता येईल का, असा एकच प्रश्न कमेंटमध्ये बहुतेकांनी केला होता. मात्र, वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच दुर्दैवाने त्या हत्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.