Father Daughter Love Viral Video : मध्यमवर्गीय कुटुंबात अनेक लहान लहान गोष्टींत आनंद, समाधान व्यक्त केलं जातं. यात वडील जेव्हा कुटुंबासाठी आणि खास करून मुलांसाठी काही स्पेशल करतात तेव्हा होणारा आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण असतं. कुटुंबाच्या अनेक लहान लहान गरजा पूर्ण करण्यासाठी ते मेहनत घेत असतात. आपली चप्पल फाटली तरी मुलांचे लाड, हट्ट, इच्छा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. सध्या अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील बाप-लेकीचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक बाप आपल्या लेकीसाठी अशी एक वस्तू आणून देतो की पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. हा व्हिडीओ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलांना रिलेट करणारा आहे, त्यामुळे पाहताना तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओच्या माध्यमातून फक्त बाप आणि लेकीमधील प्रेम, जिव्हाळा तर दिसून येतोच पण एक बाप आपल्या लेकीच्या आनंदासाठी काय करू शकतो हे दिसते.
व्हिडीओमध्ये पाहू शकता, बाप आपल्या लेकीला घरातून बाहेर घेऊन येतो, पण बाहेर येताच ती काही क्षण स्तब्ध उभी राहते. यावेळी ती जे काही पाहते, ते पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात; कारण बापाने लेकीसाठी खास सायकल आणली होती. कधी तरी या लेकीने बापाकडे हट्ट केला असेल किंवा सांगितले असेल की, बाबा मला सायकल हवी. लेकीची तीच इच्छा बापाने आज पूर्ण केली. वडिलांनी दिलेली ती सायकल पाहून लेकीचा चेहरा आनंदाने खुलतो. यानंतर डोळ्यातील आनंदाश्रू लपवत ती वडिलांना मिठी मारते. वडीलही तिला हसत हसत आपल्या मिठीत घेऊन शांत करतात. सायकल दिल्यानंतर लेकीला झालेला आनंद पाहून वडिलांनाही खूप भारी वाटतं. वडील आणि मुलीतील हा क्षण इतका भावनिक आहे की, पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावतील.
कमावलेल्या पैशातून लेकीसाठी घेतलेली ही खास वस्तू आणि ती पाहून लेकीच्या चेहऱ्यावर खुललेला आनंद ते आयुष्यभर विसरणार नाहीत. व्हिडीओमध्ये एक चमकदार गुलाबी रंगाची सायकल दिसत आहे. मुलगी त्या सायकलवर बसते आणि एक फेरफटका मारते.
हा व्हिडीओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण त्यात मध्यमवर्गीय जीवनाची संपूर्ण कहाणी आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @naughtyworld नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्यांच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “हा व्हिडीओ पाहून माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, जेव्हा माझ्या वडिलांनी मला माझी पहिली सायकल विकत घेतली होती, तो आनंद अजूनही माझ्या ह्रदयात आहे.” दुसऱ्याने लिहिले, “हे मध्यमवर्गीय जीवन आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधणे.” अनेकांनी या वडिलांचे कौतुक केले, तर काहींनी त्यांच्या पालकांनी त्यांच्या छोट्या इच्छा कशा पूर्ण केल्या याबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या.