सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला थक्क करणारे असतात तर काही पोट धरुन हसवणारे. शिवाय काही काही व्हिडीओ खूप भावनिक असतात जे पाहिल्यानंतर आपण भारावून जातो आणि आपोआप डोळे ओलावतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना भावूक करत आहे. ज्यामध्ये एका लहान मुलीला कृत्रिम पाय बसवल्यानंतर ती पहिल्यांदाच शाळेत गेल्याचं दिसत आहे. मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिला नवा पाय नव्हे तर नवजीवन मिळाल्यासारखं दिसत आहे. शिवाय आपल्या मैत्रिणीला स्वत:च्या पायांवर धावताना पाहून इतर मुली आश्चर्यचकित होऊन तिला प्रेमाने मिठी मारताचं दृश्य खूप मनमोहक आहे.
कधीकधी सोशल मीडियावर असे गोंडस व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर आपणही भावूक होतो. असाच हा व्हिडिओ आहे, जो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आणि तिची शाळकरी मित्र दिसत आहेत. खरं तर हा व्हिडिओ २०१८ मध्ये शेअर केला गेला होता, जो Buitengebieden अकाऊंटवरुन पुन्हा शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आनंदाने तिच्या मैत्रिणींकडे धावत जाताना दिसत आहे. ती तिच्या मैत्रिणींकडे जाते आणि तिचा नवीन कृत्रिम पाय दाखवते. यावेळी एक मित्र तिला आनंदाने मिठी मारतो. दरम्यान, ती धावत जाऊन तिच्या इतर मैत्रिणींना तो पाय दाखवते तसे सगळे आनंदाने जल्लोष करायला सुरुवात करतात.
या मुलीचा हा सुंदर व्हिडीओ शेअर केल्यापासून ८.१ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी या चिमुरडीच्या भावनेचे कौतुक केले आहे शिवाय तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका निष्पाप मुलीचा आनंद त्यांना हसण्याचे कारण देत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. एका ट्विटर यूजरने लिहिले की, “हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं की, “मुलगी खूप धाडसी आहे आणि तिचे मित्र तिचे मनोबल वाढवत आहेत. असे मित्र जीवनात आवश्यक असतात.”