Malaysia funny viral video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही नवीन आणि गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होतच असतात. काही व्हिडीओ पाहून हसू येतं, तर काही व्हिडीओ पाहून लोक थक्क होतात. अलीकडेच असा एक मजेशीर व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ बघताना लोकांना हसू आवरत नाहीये आणि अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मलेशियामध्ये घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. एक साधीशी घरगुती घटना लोकांच्या हसण्याचे कारण बनली आहे. एका तरुणीचा हात प्लास्टिकच्या खुर्चीत अडकला आणि तिला सोडवण्यासाठी अखेर फायर ब्रिगेडच्या जवानांना बोलवावे लागले. ही घटना ऐकताना जितकी विचित्र वाटते, तितकीच ती पाहताना मजेशीरही वाटते. व्हिडीओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले असून, “काय काय अडचणी येतात लोकांना!” असा विचार सगळ्यांच्या मनात आला आहे.

ही घटना १ नोव्हेंबर रोजी मलेशियामध्ये घडली. त्या तरुणीनं ती बसलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीच्या आसनावर एक छोटं गोल छिद्र होतं आणि गंमत म्हणून तिनं आपल्या उजव्या हाताचं छोटं बोट त्या छिद्रात घातलं. पण, काही क्षणांतच तिचं बोट अडकलं आणि बाहेर काढणं अशक्य झालं. बोट सोडवण्यासाठी तिनं वेगवेगळे उपाय करून पाहिले. बोट ओढून पाहिले, साबण आणि पाणी वापरून पाहिले; पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तिनं फायर अँड रेस्क्यू डिपार्टमेंटकडे मदत मागितली.

पाहा व्हिडिओ

फायर फायटरचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्लास्टिकच्या खुर्चीचा भाग काळजीपूर्वक कापण्यासाठी खास उपकरणे वापरली. व्हिडीओमध्ये दिसते की, ते अत्यंत बारकाईने प्लास्टिकची खुर्ची कापत आहेत आणि ती तरुणी मात्र शांतपणे बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा थोडी लाज आणि हास्य दोन्ही दिसतं. जवानांनी काही मिनिटांतच खुर्चीचा भाग कापून, तिचं बोट सुरक्षितरीत्या सोडवलं.

हा व्हिडीओ ‘@Friends of Bomba Malaysia’ या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला असून, काही तासांतच त्याला हजारो व्ह्युज मिळाले. लोकांनी विनोदी प्रतिक्रिया आणि कुतूहल दोन्ही दाखवलं आहे. एका युजरनं लिहिलं, “तिनं बोट आत टाकलं तरी का?” तर दुसऱ्यानं म्हटलं, “थोडं तेल लावलं असतं, तर इतका त्रास झाला नसता!” काहींनी मात्र फायर फायटरच्या संयमाचं कौतुक केलं आहे.

ही घटना पाहून अनेकांनी याला, “सगळ्यात अनोखं रेस्क्यू ऑपरेशन” असं म्हटलं आहे. तरुणी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण, सोशल मीडियावर तिची ही मजेशीर चूक नेटिझन्ससाठी दिवसभर नक्कीच हसण्याचा विषय झाली.