Diva railway station video: गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेने रेल्वेने अनेक विशेष रेल्वेगाड्या सोडल्या असल्या तरी या गाड्यांची संख्या पुरेशी नसल्याचे समोर आले आहे. याचे प्रत्यंततर नुकतेच दिवा रेल्वे स्थानकात आले. बुधवारी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यापूर्वीच आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमन्यांची लगबग सुरु आहे. या कोकणात निघालेल्या प्रवाशांची मोठी गर्दी दिवा स्थानकात पाहायला मिळाली. गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष गाडी दिवा स्थानकातून सोडण्यात आली होती. यावेळी गाडीच्या दुतर्फा असलेले दोन्ही रेल्वे फलाट गर्दीने फुलून गेले होते. या एका दृश्यावरुन कोकणातील गणेशभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने केलेले नियोजन किती तोकडे पडणार आहे हे दिसत आहे. दरम्यान दिवा स्टेशनवरच्या या गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र चाकरमान्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. कुटुंबकबिल्यासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची ऐनवेळी चांगलीच तारांबळ उडाली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिवा स्टेशनवर लोकांनी ट्रेनच्या वेळेच्या कितीतरी तास आधीच रेल्वे स्टेशनवर मोठी लांब लांबपर्यंत रांग लावली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी अफाट असते. बसेसची आसन संख्या पूर्ण होऊन बस उपलब्ध नसतात. भाविकांना रिझर्वेशन मिळत नाही. ट्रॅव्हलसाठी दाणादाण उडते.
पाहा व्हिडीओ
गणेशोत्सवासाठी मुंबई,पुणे यांसारख्या शहरांमधून कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावजवळ शनिवारी आणि आजही वहानांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीटा सामना करावा लागत आहे. माणगावात येताना वाहनांच्या तीन किमी रांगा लागल्यानं प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.