अनेक जण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात, कारण स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी ट्रेन हाच पर्याय खिशाला परवडणारा आहे. पण, यासाठी प्रवास करण्यापूर्वी काही दिवस आधी तिकीट बुक करावे लागते, अन्यथा जनरल कोचमधून धक्के खात प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. पण, अनेकदा अचानक प्लॅन ठरतात, अशावेळी जनरल कोचमधून प्रवास करणं हाच पर्याय असतो. पण, जनरल कोचमधील प्रवास कसा असतो हे तुमच्यापैकी काहींनी अनुभवले असेल; जिथे सीटसाठी जोरदार हाणामारी आणि भांडण पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेक लोकांनी जनरल कोचमधील अशा मुजोर प्रवाशांवर कारवाई कधी होईल, असा सवाल उपस्थित केला आहे.
प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जनरल डब्यात जागा मिळवणे सोपे काम नाही. सीटवरून एकदा वाद सुरू झाला की तो थांबणं अवघड असतं. दरम्यान, व्हायरल व्हिडीओतही दोन प्रवाशांमध्ये सीटवर बसण्यावरून वाद झाला. यावेळी दोन्ही प्रवासी एकमेकांशी भांडत व्हिडीओ काढत होते.
व्हिडीओत पाहू शकता, जनरल कोचमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. अनेक प्रवासी सीटमधील पॅसेजमध्ये जागा करून बसलेत, तर सीटवरही एकावेळी चार चार प्रवासी बसलेत. पण, एका अप्पर सीटवर एक प्रवासी मात्र संपूर्ण सीट अडवून एकटाच आरामात झोपला होता. इतक्यात तिथे एक व्यक्ती आली आणि तिने त्यास उठण्यास सांगत सीटवर जागा देण्याची विनंती केली, ज्यावर त्याने अतिशय मुजोरपणे उत्तर दिले. मी गेल्या ३६ तासांपासून प्रवास करतोय, मी सीट्वर कोणाला जागा देणार नाही. जा पुढे जाऊन दुसरी सीट बघ, अशा अरेरावीच्या भाषेत तो उत्तर देतो. यावर ती व्यक्ती म्हणते की, हा राखीव कोच नाही, जिथे तुम्ही आरामात सीटवर झोपू शकता, त्यामुळे उठ आणि इतरांना बसण्यास जागा दे, यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होतो. तिथे इतके प्रवासी असतात, पण एकही जण त्या प्रवाश्याच्या मुजोरपणावर काहीच बोलत नाही.
पण हे आजचं नाही, रोजचं आहे, जनरल कोचमध्ये प्रवास करताना असा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. सीटवर जागा असतानाही काही प्रवासी आरामदायी प्रवासासाठी संपूर्ण सीट अडवून बसतात, ज्यावरून वाद, तर अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात. पण, रेल्वेकडून या प्रवाशांवर काहीच कारवाई होत नाही.
दरम्यान, जनरल कोचमधील हा भांडणाचा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, भाईसाहब! तुम्ही जनरल कोचमधील ही गर्दी पाहताय का? दुसऱ्याने लिहिले की, किती मूर्ख आहे हा माणूस! शेवटी एकाने लिहिले की, भाऊ, जनरल कोचमध्ये अशा प्रकारची भांडणं अगदी सामान्य आहेत.