IRCTC Tatkal Ticket Booking : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करीत असाल, तर तुम्हाला माहीतच असेल की, कोणत्याही ट्रेनचे तत्काळ तिकीट बुक करणं फारच अवघड काम असते. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत किंवा मे महिन्यात तर आणखी अवघड असते. प्रवाशांना भेडसावणाऱ्या याच समस्येबाबत एका युजरने थेट आयआरसीटीसीला सवाल केला आहे.

त्याने एक्सवर काही स्क्रीनशॉट शेअर करीत म्हटले की, सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या तत्काळ बुकिंगसाठीची सर्व तिकिटे १०.०४ पर्यंत थेट वेटिंग लिस्टमध्ये जातात. हायस्पीड इंटरनेट असूनही तत्काळ तिकीट बुकिंग मिळाले नाही. याच प्रश्नावर आता आयआरसीटीसीने उत्तर दिले आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

सोनू निगम सिंग नावाच्या एका युजरने एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने तत्काळ तिकीट बुकिंगची ही वास्तविक स्थिती दोन स्क्रीनशॉटद्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी १० वाजता बुकिंग सुरू होते. गरीब रथामध्ये तत्काळ कोट्यांतर्गत २४० सीट्स होत्या. सकाळी १०.०१ – “बुकिंग सुरू झाले नाही”; पण पॉप-अप दिसेल. मग अ‍ॅप क्रॅश होते आणि बफरिंग सुरू होते. सकाळी १०.०४ वाजता अॅपवर दिसते की, आता वेटिंग लिस्टमध्ये ४१ म्हणून स्थिती दर्शविते. हाय स्पीड इंटरनेट असूनही तत्काळ तिकिटे बुक करणे जवळजवळ अशक्य होत आहे. पण, एजंट तत्काळ तिकीट बुक होईल याची कशी काय खात्री देतात हे मलाच समजत नाही. हे कसे घडते हे एक गूढच आहे.

आयआरसीटीसीने दिले ‘हे’ उत्तर

आयआरसीटीसीने म्हटले आहे की, बुकिंगच्या काळात विशेषतः तत्काळ बुकिंगच्या वेळी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने सीट्स लवकर भरल्या जातात. अनेक लोक एकाच वेळी बुकिंग करतात आणि त्यामुळे तुमच्या बुकिंगला काही अतिरिक्त वेळ लागू शकतो. आयआरसीटीसीने पुढे म्हटले की, आम्ही आमच्या सर्व युजर्सना चांगल्या सुविधा आणि बुकिंगचा अनुभव देण्यासाठी सतत काम करीत आहोत.

तत्काळ तिकीट बुकिंग किती वाजता सुरू होते?

सर्वप्रथम आयआरसीटीसी साईटवरून तुम्ही तत्काळ तिकिटे कधी बुक करू शकता ते जाणून घ्या. नियमांनुसार एसी श्रेणीतील गाड्यांसाठी तत्काळ तिकिट बुकिंग दररोज सकाळी १० वाजता सुरू होते आणि स्लीपर श्रेणीतील गाड्यांचे तत्काळ तिकीट बुकिंग दररोज सकाळी ११ वाजता सुरू होते.

तुम्ही कधी लॉग इन करावे?

एसी किंवा स्लीपरचे तत्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्ही नियोजित वेळेच्या तीन ते पाच मिनिटे आधी लॉग-इन करावे. असे केल्याने तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय योग्य वेळी लॉग इन करू शकता. पण तत्काळ बुकिंगसाठी तुम्ही कधीही १०-१५ मिनिटे आधी लॉग-इन करू नये. असे केल्याने तुमचे लॉग-इन सेशन त्वरित विंडो उघडताच बंद होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मास्टर लिस्ट तयार करा

तत्काळ बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन एक मास्टर लिस्ट बनवा. असे केल्याने तत्काळ बुकिंगच्या वेळी प्रवाशांची माहिती भरण्यात तुमचा वेळ जाणार नाही आणि तत्काळ बुकिंग करणे शक्य होईल.