King Cobra Spitting Poison Video Viral : हल्ली रील बनवण्यासाठी लोक वाट्टेल त्या थराला जाण्यास तयार असतात. प्रसंगी नको ते धाडसही करतात; पण हे धाडस त्यांच्या जीवावर बेतू शकतं याचा ते विचारच करत नाहीत. त्यात विशेषत: हल्ली प्राण्यांबरोबर व्हिडीओ बनविण्याचा एक ट्रेंड दिसून येतोय. त्यातही विषारी किंग कोब्रा किंवा अशा प्राण्यांचा समावेश असतो, ज्यांच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण, तरीही त्यातून धडा न घेता, लोक असे जीवघेणे प्रकार सुरूच ठेवतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो एक महाकाय किंग कोब्रा हातात धरून स्टंटबाजी करताना दिसतोय. त्याच्या या स्टंटबाजीत साप चक्क त्या तरुणाच्या चेहऱ्यावर विषाची उलटी करतो. त्यानंतर पुढे काय घडतं ते तुम्हीच पाहा…
इंडोनेशियातील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर सहबत आलमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सहबत एका अतिशय धोकादायक व विषारी सापाशी खेळताना दिसत आहे. सुरुवातीला सर्व काही ठीक वाटते; परंतु अचानक असं काहीतरी घडतं की, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण- साप अचानक त्याचा चेहऱ्यावर विषाची उलटी करतो, जी थेट सहबतच्या डोळ्यांजवळ उडते.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सहबत डोळ्यांवर काळा चष्मा घालून एका हातात भल्या मोठ्या किंग कोब्रा सापाला उचलून मजा-मस्ती करतोय. तो सापाकडे पाहून मुद्दाम मान हलवतोय. साप अचानक दंश करेल किंवा काय याची अजिबात कसलीही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. तो आरामात सापाला डिवचतोय; पण lते पाहून साप चिडतो आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर विषाची उलटी करतो. चेहऱ्यावर विष पडताच त्याच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना, जळजळ होऊ लागते. तो घाबरून लगेच मागे हटतो आणि डोळे चोळू लागतो. हे सर्व व्हिडीओत रेकॉर्ड झालं; पण पुढे नेमकं काय घडलं, ते समजू शकलं नाही. परंतु, ही धोकादायक घटना पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.
@sahabatalamreal नावाच्या अकाउंटवरून सापाचा हा भयानक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक सहबतला वेडा म्हणत आहेत; तर काही जण त्याच्या धाडसाचं कौतुक करीत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे सहबत पूर्णपणे सुरक्षित आहे.
व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझं अंग थरथर कापू लागलं.” दुसऱ्यानं लिहिलं, “भाऊ, आयुष्य इतकं स्वस्त नाही. तू मृत्यूशी का खेळत आहेस?” तिसऱ्यानं लिहिलं, “आता सर्व हुशारी बाहेर निघाली असेल.”
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण असाही सवाल उपस्थित करीत आहेत की, सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्युजसाठी असे धोकादायक कृत्य करणे योग्य आहे का? सहबतसारख्या कंटेंट क्रिएटर्ससाठी हा बिझनेस आहे; परंतु असे स्टंट कधी कधी घातक ठरू शकतात.