पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दुर्गा पूजा हा सर्वांत मोठा धार्मिक सण आहे. कोलकाता येथील दुर्गापूजा आणि तेथील खास सजावट पाहण्यासाठी केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात. दुर्गा पूजेच्या मंडपांमध्ये संस्कृतीची झलक आणि काही वेळा सामाजिक संदेशही दडलेला असतो. तर कोलकाता येथील काशी बोस लेन येथील देवीची स्थापना केलेल्या मंडळाने एक अनोखा संदेश देणारी सजावट केली आहे. मुलींसोबत घडणाऱ्या अनेक वाईट घटना देवीच्या मंडपातील सजावटीमध्ये मांडून एक अनोखं दृश्य दाखवले आहे, जे पाहून तुम्ही काही क्षणासाठी भावुक व्हाल.
मंडपाबाहेर एका मुलीला गोणीमध्ये बंद करून ठेवले आहे असे दृश्य दाखवण्यात आले आहे. तर अत्याचाराला बळी पडलेल्या मुली आरशात स्वतःला बघताना दिसत आहेत आणि देवीसोबत स्वतःची तुलना करीत आहेत आणि या सगळ्यातून एक मुलगी मुक्त होण्यासाठी खिडकीच्या बाहेर उडी घेत आहे, असे दृश्य दाखवण्यात आले आहे. या सगळ्यांच्यामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि देवीच्या मूर्तीला बेरंग दाखवण्यात आले आहे. कशाप्रकारे देवीची स्थापना केलेल्या मंडळात हा नाजूक विषय चित्रित करण्यात आला आहे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
देवीची स्थापना करून दिला अनोखा संदेश :
मंडपात स्थापन केलेल्या देवीची वस्त्रे बेरंग आहेत आणि देवीचे वस्त्र म्हणजेच साडी या अत्याचार झालेल्या मुलींचे संरक्षण करताना दाखवली आहे. तसेच देवीच्या पुढे एका मुलीला देवीच्या रूपात लाल साडी नेसून बसवले आहे आणि तिची पूजा केली जाते आहे. तसेच त्या मुलीचे डोळे अगदीच भावुक करणारे आहेत. या सर्व चित्रीकरणातून मंडळाला असा संदेश द्यायचा आहे की, जर आपण आपल्या घरात आणि आजूबाजूच्या महिला आणि मुलींचा आदर केला आणि त्यांचीच पूजा केली, तर देवी प्रसन्न होईल आणि पूजा स्वीकारेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @_the_vivacious या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पूनम असे या युजरचे नाव असून ती एक ब्लॉगर आहे. अनेक जण सजावट करणाऱ्या कलाकाराचे मनापासून कौतुक करत आहेत. तसेच आतापर्यंत पाहिलेली सगळ्यात सुंदर सजावट असेदेखील काही जण कमेंट करताना दिसून आले आहेत. तर व्हिडीओ पाहून काही जणांच्या अंगावर काटा आला आहे, असा अनुभव ते शेअर करताना दिसले आहेत. तसेच युजरने व्हिडीओ शूट करताना या सर्व सजावटीची माहितीसुद्धा व्हिडीओत सांगितली आहे.