Mukbang viral video : आपल्याला जर खूप, अतिप्रचंड भूक लागली असेल, तेव्हा आपण म्हणताना म्हणतो की, आज पातेलंभर भात खाईन किंवा १० पोळ्या खाईन वगैरे वगैरे… परंतु, प्रत्यक्षात मात्र जेवताना फारतर दोन पोळ्या जास्त खातो. असे असताना सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीने शब्दशः ताटभर इडल्या खाल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. बरे, तो ज्या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी बसून खात आहे तेदेखील अगदी बघण्यासारखे आहे, असे म्हणावे लागेल.
दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये सर्वांत झटपट मिळणारा, सर्वांत पौष्टिक असा पदार्थ म्हणजे इडली. सकाळच्या नाश्त्यासाठी इडली अगदी पोटभरीचे अन्न असते. दोन किंवा जास्तीत जास्त चार इडल्या सकाळी खाल्ल्या की, दुपारपर्यंत पोट एकदम भरलेले राहते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील एका व्यक्तीने अंदाजे २५ ते ३० इडल्या, पातेलीभर चटणीसह बसल्या बैठकीला संपवल्या आहेत. हे त्याने कसे केले ते पाहा.
ही वाचा : “अशा मोमोपेक्षा विष चांगलं…” असे का म्हणत आहेत नेटकरी? व्हायरल होणारा ‘हा’ Video पाहा…
व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका चारचाकी वाहनामध्ये शूट केलेला आहे. गाडीच्या स्टिअरिंग व्हीलसमोर बसून एक गृहस्थ एक मोठे ताट आणि त्यामध्ये ठेवलेला इडल्यांचा भलामोठा डबा दाखवतो. नंतर तोच डबा ताटामध्ये उलटा करून सर्व इडल्या काढून घेतो. इडल्यांना व्यवस्थित रचून, त्यामध्ये जवळपास पातेलेभर चटणी आणि मसाला टाकून, एकेक इडली खाण्यास सुरुवात करतो.
काही इडल्या खाऊन झाल्यानंतर तो पुन्हा पातेल्यातील उरलेली चटणी ताटात ओतून घेतो. मात्र, तो आता सर्व इडल्या भातासारख्या कुस्करून खाऊन संपवतो. सर्व ताट व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर तो त्यावर पाणी पिऊन हा व्हिडीओ संपवतो.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @foodie.on.wheelz नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. अशा प्रकारचे भरमसाट अन्न खाण्याचा व्हिडीओ बनवणे किंवा त्याला ऑनलाइन स्ट्रीम करण्याच्या प्रकाराला ‘मकबंग/मुकबंग’ [Mukbang] असे म्हणतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहू.
“बापरे, या माणसाने पाण्यापेक्षा चटणीच जास्त प्यायली आहे,” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “हा फूड व्लॉगर नाही; बकासुर आहे,” असे दुसऱ्याने म्हटले आहे. तिसऱ्याने, “इडल्या एकट्याने खाल्ल्या? हा महिनाभराचा ऐवज होता” असे लिहिले आहे. चौथ्याने, “अरे, सांबारं राहिलं राव” असे म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “मी आता या जन्मात परत इडली खाणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodie.on.wheelz नावाच्या अकाउंटद्वारे शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १६.५ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.