जगभरातील प्रसिद्ध शेफ, त्यांचं मॉर्डन किचन आणि त्यात बनवले जाणारे जगभरातील नाना चवीचे पदार्थ.. असे कुकिंग शो आपण टीव्ही, युट्युबवर नेहमीच पाहतो पण यापेक्षाही आगळा वेगळा कुकिंग शो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. याला आगळ वेगळा म्हणणेच योग्य ठरले कारण या कुकिंग शोमध्ये चककीत लाद्यांचे आधुनिक किचन नाही, ना उच्चारायला अवघड असणारे परदेशी साहित्य, ना फाडफाड इंग्रजी बोलणारे शेफ. पण तरीही या कुकिंग शोची चर्चा सोशल मीडियावर आहे कारण या कुकिंग शोमध्ये आहे खास देसी तडका. या शोमध्ये शेफ आहेत ते तुमच्या आमच्या सारखे अगदी सामान्य माणसं. त्यामुळे ‘व्हिलेज फूड फॅक्टीरी’चा हा कुकिंग शो सगळ्यात हटके ठरला आहे.
व्हिलेज फूड फॅक्टीरीमध्ये अस्सल गावरान पाककृती दाखवल्या जातात. दक्षिणेकडील एका गावात चित्रित केलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खास दाक्षिणात्य पद्धतीची अंड्याची आमटी बनवून दाखवली. इतकेच नाही तर यासाठी एक दोन डझन नाही तर चक्क ३०० अंड्यांचा वापर त्यांनी केला. चुलीवर खास दाक्षिणात्य पद्धतीने बनवल्या अंड्याच्या आमटीचा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी या चॅनेलने युट्युबवर शेअर केला होता आणि तीन दिवसांत लाखो लोकांनी तो शेअर देखील केला.