Man wakes to cockroach stuck in his throat: घरात अनेकदा झुरळांचा वावर पाहायला मिळतो. अगदी किचनपासून ते बाथरूमपर्यंत ही झुरळं गृहिणींच्या नाकीनऊ आणत असल्याचं दिसून येतं. या झुरळांचा नायनाट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात; पण एकाबरोबर एक, अशी त्यांची संख्या वाढतच जाताना दिसते. अशा वेळी झुरळांचा नायनाट करणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे अनेकदा ती किचनमधील भांड्यांवर, तर कधी बेडवर फिरताना दिसतात. पण हेच झुरळ एखाद्या व्यक्तीच्या नाकात शिरल्याची गोष्ट कधी ऐकली आहे का? वाचून थोडं विचित्र वाटेल; पण प्रत्यक्षात झोपेत एका व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरलं. त्यानंतर असं काही झालं की, वाचून तुम्हाला किळसही वाटेल आणि आश्चर्यदेखील. नेमकं काय झालं ते आपण पुढे जाणून घेऊ…
चीनमधील एका ५८ वर्षीय व्यक्तीबरोबर ही अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. रात्री गाढ झोपेत असताना अचानक त्याचा नाकात एक झुरळ शिरलं. त्यावेळी नाकात काहीतरी रेंगाळल्यासारखं विचित्र वाटू लागल्यानं तो झोपेतून जागा झाला. तितक्यात नाकातील गोष्ट घशाखाली गेल्याचं त्याला जाणवलं आणि त्याला खोकला येऊ लागला. परंतु प्रयत्न करूनही ते नाकात गेलेलं झुरळ तो काढू शकला नाही.
तीन दिवसांनी श्वसनमार्गातून येऊ लागली दुर्गंधी
एका स्थानिक चिनी वृत्तपत्रानुसार, गाढ झोपेत असल्यानं त्यानं नेमकं काय घडलं हे समजून न घेताच तो पुन्हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्या घटनेकडे दुर्लक्ष करून तो आपल्या कामावर निघून गेला. पण पुढील तीन दिवसांत श्वसनमार्गातून दुर्गंधी येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. दात घासले, तोंड नीट धुतलं तरी श्वसनातून येणारी दुर्गंधी कमी झाली नाही. इतकंच नाही तर त्याच्या थुंकीतून पिवळसर द्रव येऊ लागला. हे काहीतरी विचित्र असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि अखेर शेवटी त्यानं वैद्यकीय मदत घेतली.
छातीच्या सीटी स्कॅनमध्ये दिसली झुरळाची सावली
चीनच्या हैनान प्रांतातील हायकोउ येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीनं हैनान रुग्णालयात जाऊन ईएनटी तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली. तेथे त्याच्या वरच्या श्वसनमार्गाच्या तपासणीत काहीही असामान्य असं काही आढळले नाही. पण वेगळी लक्षणं दिसल्यानं काहीतरी गडबड असल्याचे म्हणत ईएनटी तज्ज्ञांनी त्याला श्वसन आणि क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. लिन लिंग यांच्याकडे पाठवलं. डॉ. लिन यांनी छातीचे सीटी स्कॅन केले, ज्यात उजव्या बाजूच्या खालच्या फुप्फुसात एका बाजूला एक सावली दिसली, जिथे काहीतरी असल्याचं सूचित होत होतं.
त्यामुळे पुढील तपासणीत त्या व्यक्तीला ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा सल्ला देण्यात आला. डॉ. लिन यांनी आउटलेटला सांगितलं की, या प्रक्रियेदरम्यान मला फुप्फुसातील त्या भागात पंख असलेलं काहीतरी स्पष्टपणे दिसलं. जे कफामध्ये गुरफटलं गेलं होतं.जेव्हा आम्ही आजूबाजूचा कफ काढून टाकला तेव्हा आम्हाला आढळलं की, ते झुरळ आहे.
Read More Trending News : दोन वर्षं लोकांना मूर्ख बनवीत यूट्यूबरनं घटवलं तब्बल ११४ किलो वजन; Video मध्ये पाहा त्यानं नेमकं केलं तरी काय?
अखेर त्या व्यक्तीच्या नाकावाटे शरीरात शिरलेलं झुरळ काळजीपूर्वक काढून टाकण्यात आलं असून ती जागा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली आहे. त्यामुळे नाकावाटे रुग्णाला येणारा उग्र वासही बंद झाला. तो पूर्ण बरा झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. लिन म्हणाले की, जरी अशी असामान्य प्रकरणे दुर्मीळ असली तरीही त्यांनी सल्ला दिला की, जर कोणाला त्यांच्या श्वसनमार्गामध्ये काहीतरी अडकलं आहे, अशी शंका जरी आली तरी त्यांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.