Dadar Milk Thief Video : मुंबईसह अनेक शहरांमध्ये दररोज चोरीच्या अनेक घटना समोर येतात. त्यात चोर कधी काय चोरी करून जाईल ते सांगता येत नाही. चोर दागिने, मौल्यवान वस्तू व पैशांची चोरी करतात हे आपण अनेकदा ऐकतो; पण हल्ली काही चोर घराबाहेर सुकत घातलेल्या अंतर्वस्त्रांपासून ते घराबाहेरील बल्बही चोरत असल्याचे दिसून येत आहे. पण, मुंबईतील दादरमध्ये एक चोर दूध भरलेल्या पिशव्यांची चोरी करायचा. दररोज पहाटेच्या वेळी हा चोर दादरमधील एका दुकानाबाहेर ठेवलेल्या ट्रेमधून दुधाच्या पिशव्या चोरून निघून जायचा. मात्र, त्याबाबतचा संशय मांजरीवर घेतला जायचा. या चोरीच्या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या दूधचोरामुळे विक्रेता खूप हैराण झाला होता. रोज अशा प्रकारे दूध चोरी होत असल्याने होणाऱ्या नुकसानीमुळे तो चिंतेत होता. यावेळी पोलिसांची वाट न बघता, त्याने स्थानिकांच्या मदतीने एक सापळा रचला आणि चोराला रंगेहाथ पकडले. या चोरीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.
दादरमधील दूध चोरीचा व्हिडीओ व्हायरल (Milk Thief caught on Red Handed in Dadar)
अनेक दिवसांपासून दादरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसरात दूधचोरीच्या घटना घडत होत्या. कोणीतरी अनोळखी व्यक्ती दुकानाबाहेरील ट्रेमधून पहाटेच्या सुमारास दुधाच्या पिशव्यांची चोरी करीत होती. त्यामुळे त्या चोराला पकडण्यासाठी एक दिवस दूध व्यावसायिक संकेत गोलतकर यांनी सापळा रचला आणि त्यात तो चोर अलगद अडकला. व्यावसायिक संकेत गोलतकर एक दिवस एका झाडाच्या मागे लपून बसले. नेहमीप्रमाणे तो चोर दुधाच्या पिशव्या चोरण्यासाठी तेथे आला आणि पिशव्या चोरी करून निघाला होता. पण, यावेळी त्याच्या पाळतीवर असलेल्या गोलतकर यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेचा एक व्हिडीओ dadarmumbaikar या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या दूधचोराचे नाव दत्तात्रय प्रकाश काकडे असे असून, तो दादरच्या उपेंद्र नगरातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशीनुसार त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर आता लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. काहींनी अखेर या प्रकरणातून मांजरीची निर्दोष मुक्तता झाली, असे म्हटले; तर काहींनी चोराने आपली भूक मिटविण्यासाठी असे केले असेल, असे म्हटले आहे. त्याशिवाय काहींनी फार भन्नाट कमेंट्स केल्यात.