कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे फेक फोटो आणि व्हिडिओंचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वास्तविक आणि बनावट यातील फरक ओळखणे सामान्य लोकांसाठी कठीण झाले असून सोशल मीडियावर अशा AI-जनरेटेड व्हिडिओंमुळे लोकांमध्ये गोंधळ आणि घाबराट निर्माण होत आहे. याचाच ताजा नमुना मुंबईतील फीनिक्स मॉलच्या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळाला, ज्यात बिबट्या मॉलच्या आत फिरताना दिसतो. अनेकांनी तो खरा समजून भीती व्यक्त केली, मात्र काही तासांतच स्पष्ट झाले की हा फक्त AI ने बनवलेला बनावट व्हिडिओ आहे.

मुंबईतल्या फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये एका बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेला सुरुवात झाली. हा व्हिडीओ पाहून लोक सुरुवातीला खूप घाबरले. काहींनी भीती व्यक्त केली तर काहींनी हसत मजेशीर घेतल , पण, तज्ज्ञांनी सांगितले की हा व्हिडीओ खरा नाही. हा फक्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला आहे, म्हणजेच ‘डीपफेक’ व्हिडीओ आहे. म्हणजे प्रत्यक्षात बिबट्या मॉलमध्ये नाही. व्हिडीओ इतका वास्तवदर्शी वाटतो की पाहणाऱ्यांना खरा वाटतो. बिबट्याची हालचाल, त्याची सावली, प्रकाशमान सगळं अगदी वास्तविक वाटतं. पण, हे सगळं फक्त संगणकाने तयार केलेलं आहे.

व्हिडीओमध्ये एक मोठा बिबट्या मॉलच्या गल्लीमधून आणि भिंतीजवळून फिरताना दिसतो. त्याचा चालण्याचा आवाज, प्रकाश आणि सावल्या अगदी खऱ्या वाटतात. लोक मॉलमधील  बिबट्यांकडे आश्चर्याने पाहतो आणि काही क्षणांत लोक घाबरलेले दिसतात. हा संपूर्ण व्हिडीओ पाहून लोकांना वाटले की बिबट्या प्रत्यक्षात मॉलमध्ये आला आहे.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांनी लगेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी हसत म्हटले, “असं वाटतंय की बिबट्या दिवाळी खरेदीसाठी मॉलमध्ये आला आहे!” तर काही लोक घाबरले आणि सुरक्षा कशी असेल याची चिंता केली. पण, काही तासांत लोकांना कळाले की हा व्हिडीओ खरा नाही, फक्त संगणकाने तयार केलेला आहे.

तज्ज्ञांचा म्हणे आहे की असे व्हिडीओ फक्त लोकांना घाबरवण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी बनवले जातात. फिनिक्स मॉलच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की मॉलमध्ये कुठलाही बिबट्या दिसला नाही आणि हा व्हिडीओ खोटा आहे. मुंबईतील हा प्रकार नाशिकसारख्या शहरांमध्येदेखील घडला होता. तिथे काही दिवसांपूर्वी बिबट्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. फॅक्ट चेक केल्यावर हे सगळे खोटे असल्याचे समोर आले. काही व्हिडीओ पूर्णपणे बनावट होते, तर काही AI तंत्रज्ञानाने तयार केलेले होते. लोकांनी अशा व्हिडीओंवर लगेच विश्वास ठेवू नये. हे फक्त मनोरंजनासाठी तयार केलेले असतात आणि त्यामुळे घाबरायची गरज नाही.