Video Shows Man Throws Off Cat From 9th Floor : प्राणीप्रेमी असणारे अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. मांजर, कुत्रा, कासव, ससा आदी अनेक प्राण्यांना आवडीने घरी घेऊन येतात आणि त्यांची काळजी घेतात.पण, याउलट काही अशी माणसे सुद्धा असतात; जे प्राण्यांना दारात आल्यावर चप्पल, काठीने मारतात आणि हकलवून लावतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका माणसाने मांजरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मालाड येथील एका इमारतीत कासम सय्यद या माणसाने केलेले धक्कादायक कृत्य समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजचे दृश्य आहे. इमारतीच्या खिडकीजवळ बुटांच्या कपाटावर एक मांजर उभी असते. काही वेळात तिथे कासम सय्यद बॅग घेऊन येतो. बॅग घराजवळ ठेवून तो घराची डोअरबेल सुद्धा वाजवतो. त्यानंतर त्याच्या मनात काय येतं माहिती नाही. पण, तो पुन्हा माजरीकडे जातो. तसेच तो इथपर्यंत थांबत नाही.
मांजरीला फेकलं खाली (Viral Video)
तो मांजरीला बूट ठेवायच्या कपाटावरून उचलतो आणि थेट खिडकीतून खाली फेकतो. मांजरीला फेकल्यामुळे ती खाली असलेल्या धातूच्या पत्र्यावर पडली आणि जागीच मरण पावली. तसेच इमारतीच्या नवव्या मजल्यावरून मांजरीला फेकून दिल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना मालाडमधील मालवणी परिसरात घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कासम सय्यद या माणसाचे कृत्य व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
तसेच या घटनेचा ऑनलाइन व्हायरल होणाऱ्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये, एक अज्ञात माणूस व्हिडीओ रेकॉर्ड करत सय्यदवर कारवाई करण्याची मागणी करताना दिसतो आहे. तसेच तो सय्यदच्या घराचा दरवाजा आणि त्याने मांजर फेकल्याची जागा सुद्धा व्हिडीओत दाखवताना दिसतो आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल सय्यदविरुद्ध कारवाई करण्यासाठी मालवणी पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्राची प्रत देखील जोडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @changu311 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करताना दिसत आहेत.