आजकाल एखादी वस्तू दुकानात किंवा मॉलमध्ये जाऊन घेण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग करण्यास लोक पसंती देत आहेत. कोणतीही वस्तू लागली की फोनमध्ये अपवर, वेबसाइटवर जायचं आणि ऑर्डर करायची. ती वस्तू घरपोच मिळते. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शॉपिंग करण्यात वाढ झाली आहे. बाहेर न पडता आपल्याला हवं ते मिळतं. पण बऱ्याचदा असं होतं की आपण ऑर्डर केलेल्या वस्तूऐवजी दूसरं काहीतरी आपल्याला मिळतं. किंवा ऑर्डर केलेली वस्तू खराब निघते. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका युजरने अमेझॉनवरून पासपोर्ट कव्हर मागवलं होतं. पण त्याला चक्क पासपोर्टच मिळाला आहे.

३० ऑक्टोबरला मिथुन नावाच्या युजरने अॅमेझॉनवरून पासपोर्ट कव्हर मागवले. त्याला १ नोव्हेंबरला डिलेव्हरी मिळाली. परंतु त्याने बॉक्स उघडून पाहिला असता त्याला कव्हरसह खरा पासपोर्ट आढळला. त्यानंतर मिथुनने तात्काळ अॅमेझॉन कस्टमर केअरशी संपर्क साधला. पण कस्टमर केअरने दिलेल्य उत्तरामुळे तो आणखीच गोंधळा. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने सांगितले की “ही चूक पुन्हा होणार नाही आणि आम्ही पुढील वेळी विक्रेत्याला सावधगिरी बाळगण्याची सूचना देऊ.” मात्र, कव्हरसोबत आलेल्या पासपोर्टचे काय करायचे ते त्यांनी सांगितलेच नाही.

खऱ्या पासपोर्टमधील माहितीनुसार, तो केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मोहम्मद सालीहचा आहे. पासपोर्टमध्ये फोन नंबर नसल्याने सुरुवातीला मालकाशी संपर्क होऊ शकला नाही. पण मिथुनच्या प्रयत्नांमुळे पासपोर्टचा मालक सापडला. मिथुनने सांगितले की, “त्याला मिळालेले पासपोर्ट कव्हर कदाचित मुहम्मद सालीहने आधी ऑर्डर केले असावे आणि त्याने स्वतःचा पासपोर्ट वापरून कव्हर तपासले असावे. पण त्याला कव्हर आवडले नसेल तर त्याने पासपोर्ट न काढता कव्हर परत पाठवले. विक्रेत्याने देखील परत आलेल्या कव्हरची योग्यरित्या तपासणी केली नाही आणि जेव्हा त्यांना दुसरी ऑर्डर मिळाली तेव्हा त्यांनी ते विकले असेल.”

दरम्यान, मिथुन लवकरच पासपोर्ट त्याच्या मूळ मालकाला देण्याचा विचार करत आहे.