पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. खासकरून पशुप्रेमींसाठी हा व्हिडीओ मोठी पर्वणी आहे. कारण असं कि, या व्हिडीओमध्ये कळविटांचा एक खूप मोठा कळप मजेत टुणटुण उड्या मारत रस्ता ओलांडताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे या कळपात थोडी थोडकी नव्हे तर हजारो काळवीटं एकत्र पाहायला मिळत आहेत. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय अभयारण्यातील हा अत्यंत नयनरम्य असा व्हिडीओ आहे. या सुंदर दृश्याचं वर्णन पंतप्रधान मोदींनी “उत्कृष्ट” या एका शब्दात केलं आहे. सर्वात आधी गुजरातच्या माहिती विभागाने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

‘त्या’ कळपात ३ हजारांहूनही अधिक काळवीटं

पंतप्रधान मोदींनी रिट्विट केलेला काळविटांच्या प्रचंड मोठ्या कळपाचा हा व्हिडीओ गुजरातमधील भावनगर येथील वेलवदार वेलवदार राष्ट्रीय उद्यानातील असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या माहिती विभागाने सांगितल्यानुसार, काळविटांच्या या मोठ्या कळपात तब्बल ३००० हुन अधिक काळवीटं होती. काळवीट हा मुळातच अत्यंत सुंदर प्राण्यांमध्ये गणला जातो. म्हणूनच, अशा या सुंदर प्राण्यांना हजारोंच्या संख्येनं एकत्र आणि मुक्त संचार करताना पाहणं ही पशुप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरली. दरम्यान, गुजरातमधील भावनगरच्या उत्तरेला केवळ एका तासाच्या अंतरावर असलेलं हे वेलवदार राष्ट्रीय उद्यान हे काळविटांच्या लोकसंख्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.

दक्षिणेस खंभाटच्या आखाती किनाऱ्यांना बिलगून असलेलं हे वेलवदार राष्ट्रीय उद्यान ३४ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. दरम्यान, काळवीटांव्यतिरिक्त या उद्यानात अनेक पक्षी व प्राणांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. सोबतच पेलिकन व फ्लेमिंगोसारख्या स्थलांतरित पक्ष्यांच्या देखील अनेक प्रजाती या अभयारण्यात आढळून येतात.

अनेक वर्षांपासून धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये समावेश

तुम्हाला कल्पना असेलच की, काळवीट हे संरक्षित प्राणी आहेत. १९७२ सालापासून वन्यजीव अधिनियमानुसार त्यांची शिकार करण्यावर पूर्ण बंदी आहे. एकेकाळी भारतीय उपखंडात कळविटांची प्रचंड व्यापक प्रमाणात झालेली शिकार, जंगलतोड आणि अधिवासात झालेली अधोगती या कारणांमुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळालं. परिणामी, त्यानंतर आता अनेक वर्षांपासून ती धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीचा एक भाग बनली आहेत.