Police Action Shocking Video Viral : राज्यात किंवा शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते. मात्र, अनेकदा पोलिसच कायदा हातात घेताना दिसतात. सध्या पोलिसांच्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील कोटा शहरातील आहे. जिथे काही पोलीस अधिकारी एका दुकानदाराला भररस्त्यात सर्वांसमोर कानशिलात लगावताना दिसतायत. पोलिसांचे हे कृत्य जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे, जो पाहून लोक पोलिसांच्या गुंडशाही कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत आहेत.
रस्त्यावर ठेवलेल्या वस्तू आणि दुचाकी बाजूला हटवण्यावरून हा वाद सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी चक्क कायदा हातात घेत दुकानदाराला मारहाण केली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे प्रकरण शहरातील कैथुनीपोल भागातील आहे, जिथे पोलिस ठाणे अंमलदार स्टेशन हाउस ऑफिसर पुष्पेंद्र बन्सीवाल यांच्यावर एका दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना २९ मे २०२५ ची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दिवशी रस्त्याच्या कडेला उभी असलेली बाईक हटविण्यावरून वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, एसएचओ स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि दुकानदार रिझवानशी झालेल्या वादादरम्यान त्यांची हाणामारी झाली.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, पोलिस अधिकारी खूपच आक्रमकपणे दुकानदाराला मारहाण करीत आहे. चर्चेने प्रकरण सोडविण्याऐवजी पोलीस थेट मारहाण करू लागले. त्यात दुकानदार जमिनीवर कोसळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.
स्थानिक व्यापारीदेखील पोलिसांच्या या गुंड प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. वर्दीच्या जोरावर अशी गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.
मात्र, या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस विधान केले गेलेले नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचे स्वरूप गंभीर होत चालले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते आणि दोषींवर काही कारवाई होते की नाही ते पाहावे लागेल.
हा व्हिडीओ @NCMIdiaa ने त्यांच्या एक्स-अकाउंटवरून शेअर केला आहे ,जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईकदेखील केले आहे. त्यावर युजर्सदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, सरकारने गुंडांना पोसले आहे. दुसऱ्याने लिहिले की, संबंधित पोलिस अधिकाऱ्याला कामावरून कायमचे काढून टाकले पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, त्यांचे हात फक्त गरिबांवरच उचलले जातात.