अलाहाबाद एफएम वाहिनीच्या लाइव्ह कार्यक्रमाच्या दरम्यान रेडिओ जॉकीचा राजीनामा जाहीर केल्यामुळे निधी नावाची रेड एफमची सूत्रसंचालिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. एफएम रेडिओ वाहिनीवर कार्यरत असणाऱ्या निधीने गुंडाच्या त्रास झाल्याने काम सोडण्याचा निर्णय घेतला होता. रात्री अपरात्री कामावरुन घरी परतत असताना एका तरुणीला कशा प्रकारे त्रासाचा सामना करवा लागतो याचा थरारक अनुभव आल्यानंतर निधीने काम सोडण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी रेडिओ लाइव्ह शोच्या दरम्यान तिने आपला अनुभव कथन करुन आपण नोकरीतून स्वेच्छानिवृती घेत असल्याचे जाहीर केले. ती नेहमी रात्री ९ नंतर आपला कार्यक्रम आटोपून घरी जात असते. कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी जात असताना निधीला तीन टवाळखोर दुचाकी स्वारांनी रस्तावर अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने या दुचाकी टवाळखोरांचा सामना केला. पण रात्री अपरात्रीच्या कामाच्या वेळेनुसार अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून निधीने दुसऱ्या दिवशी चक्क रेडिओ जॉकीची नोकरी सोडत असल्याची कार्यक्रमादरम्यानच घोषणा केली. तिने रेड एफएम वाहिनीवरील आपल्या कार्यक्रमातुन रस्त्यावरुन आपल्याला त्रास देणाऱ्या तरुणांचे वर्णन देखील सांगितले. १७ ते १८ वर्षाची तरुणांनी तिच्याशी असभ्य वर्तन केले होते. या टवाळखोरांनी फ्लाईंग किस करत निधीला भिती दाखविण्याचा प्रयत्न केला. पण निधीने आरडा ओरडा केल्यामुळे टवाळखोरांनी पळ काढला होता.
निधीने कार्यक्रमाच्या माध्यमातून जाहीरपणे आपल्यासोबत घडलेली घटना सांगितल्यानंतर तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. तसेच तिने टवाळखोरांच्या भीतीपोटी नोकरी सोडू नये, यासाठी प्रेक्षकांनी दुरध्वनी करुन निधीला समजावले. आपल्याला मिळणाऱ्या पाठिंब्यानंतर निधीने नोकरी सोडण्याचा निर्णय बदलला आहे. दरम्यान तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये निधी टवाळखोरांनी रेडिओवर माफीनामा मागावा, अशी मागणी करताना दिसत आहे.