Shocking News: तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून पतीची क्रूरपणे हत्या केली. या हत्येचा कट असा आखला गेली की, त्या महिलेनं ती कशी करावी यासाठी यूट्यूबवरून टिप्स घेतल्या. मृत व्यक्तीचं नाव संपत असून, तो लायब्ररीत सफाई कामगार होता. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

FPJच्या माहितीनुसार, संपतला दारूची सवय होती आणि तो नेहमी दारूच्या नशेत पत्नी रमादेवीसोबत भांडत असे. त्यांना दोन मुलं आहेत. रमादेवी आपल्या खाऊच्या दुकानातून घरखर्च चालवत होती. त्या दुकानातच तिची भेट ५० वर्षांच्या करण राजय्या याच्याशी झाली. नंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध तयार झाले.

पोलीस तपासात समोर आलं की, रमादेवीला तिच्या पतीपासून सुटका हवी होती. त्यासाठी तिनं यूट्यूबवर शोध घेतला आणि एक व्हिडीओ पाहिला, ज्यात कुणाच्या कानात कीटकनाशक टाकून हत्या कशी करायची हे दाखवलं होतं. रमादेवीनं हा भयानक प्लॅन आपल्या प्रियकर राजय्याला सांगितला आणि दोघांनी मिळून हत्या करण्याचं ठरवलं.

रमादेवीच्या प्रियकर आणि त्याच्या मित्रानं संपतला दारू पाजली. दारू पिऊन संपत बेशुद्ध होऊन झोपल्यावर रमादेवीचा प्रियकर राजय्यानं त्याच्या कानात कीटकनाशक टाकलं. त्यातच संपतचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची कारवाई

दुसऱ्या दिवशी रामादेवीनं पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली. १ ऑगस्टला संपतचा मृतदेह सापडला. पोलिसांना संशय आला की, रमादेवी आणि राजय्याने त्याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करू नये, असं सांगितलं होतं. पण, मृत संपतच्या मुलालाही मृत्यूबाबत शंका आली आणि त्यानं पोलिसांकडे चौकशीची मागणी केली.

थोडी चौकशी केल्यावर पोलिसांनी कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज व लोकेशन तपासले. त्यातून त्यांची चौकशी तीन आरोपींपर्यंत पोहोचली. रामादेवी, तिचा प्रियकर व त्याचा मित्र यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रमादेवी, राजय्या व श्रीनिवास यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.