Viral Video: आव्हान आणि विरंगुळा म्हणून खेळला जाणारा एकमेव खेळ म्हणजे रुबिक क्यूबचे कोडे. आपल्यातील प्रत्येकाने हे कोडे सोडविण्याचा प्रयत्न एकदा तरी नक्कीच केला असेल. त्यावरून हे कोडे सोडवणे किती अवघड असेल याची प्रत्येकालाच कल्पना आली असेल. विविध रंगांचे चौकोन असलेले या रुबिक क्यूबचे कोडे सोडविण्याचे वेड लहानथोर सगळ्यांनाच लागले असल्याचे दिसून येते. तसेच हे कोडे सोडविण्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाही झाल्या आहेत. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखे पाहायला मिळाले आहे. आज कोणत्या महिला किंवा पुरुषाने नाही, तर चक्क रोबोटने रुबिक क्यूबचे हे कोडे सोडवून दाखविले आहे. चला तर जाणून घेऊ या खास रोबोटबद्दल.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जपानचा आहे. जपानमधील एका कंपनीच्या रोबोटला रुबिक क्यूबचे कोडे सोडविण्यास सांगितले. या रोबोटने केवळ ०.०३५ सेकंदात हे कोडे सोडवून दाखवले आहे. तसेच या रोबोटने आपल्या या उत्तम कामगिरीद्वारे मित्सुबिशी (Mitsubishi) इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन कंपनीला प्रतिष्ठित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या यादीत प्रतिष्ठेचे स्थानही मिळवून दिले आहे. कंपनीचा हा रोबोट रुबिक क्यूबचे कोडे सोडविणारा सर्वांत वेगवान रोबोट बनला आहे. रोबोटने कशा प्रकारे रुबिक क्यूबचे कोडे सोडवले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा

हेही वाचा…रेल्वेगाडीच्या डब्याची झाली कचरापेटी; सफाई कर्मचाऱ्याचा ‘तो’ VIDEO पाहून वाटेल चिंता, म्हणाल, ‘कचराकुंडी वापरा…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एका काचेच्या बॉक्समध्ये छोटा रोबोट ठेवलेला असतो. रोबोटच्या हातात एक रुबिक क्यूब ठेवलेले असते. कंपनीचे अनेक कर्मचारी तेथे आजूबाजूलाच उपस्थित असतात. टाइम स्टार्ट होताच कॅमेरा रोबोटच्या हातांकडे जातो आणि तुमच्या डोळ्यांची एकदा उघडझाप होण्यापूर्वीच म्हणजे अवघ्या ०.०३५ सेकंदात हा रोबोट हे कोडे सोडवून दाखवतो. त्यानंतर तेथे जमलेले कर्मचारी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करतात. जपानी रोबोटने स्वतःचा मागील विक्रम मोडून काढत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नवा विक्रम नोंदविला आहे, असेसुद्धा सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या अधिकृत @GWR एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या यशाचे श्रेय जपानी कंपनीच्या मोटर आणि जनरेटर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियरिंग विभागाशी संबंधित असलेल्या टोकुई यांना देण्यात आले. कारण – हा विक्रमी प्रयत्न त्यांच्यामुळे यशस्वी झाला आहे, असे सांगण्यात येत आहे. तसेच टोकुई यांना त्यांच्या रोबोटची कार्यक्षमता जगासमोर दाखवायची होती, असे त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सशी संवाद साधताना सांगितले आहे.