आज प्रत्येकाला सोशल मीडियाबद्दल सर्वप्रकारची माहिती असून आपण दररोज त्याचा वापरदेखील करत असतो. परंतु, सोशल मीडियाबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नसताना वयाच्या ८५ व्या वर्षी विजय निश्चल यांनी आपला ‘दादी कि रसोई’ नावाचा यूट्यूब चॅनेल सुरू केला. त्यानंतर चॅनेलला जोरदार प्रतिसाद मिळून, विजय निश्चल या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. विजय निश्चल या आपल्या चॅनेलवरून तरुण पिढी म्हणजे सध्याच्या ‘जेन झी’ला ९० सेकंदांमध्ये पाककलेचे धडे देत आहेत. आपल्या सोप्या रेसिपी आणि भन्नाट व्हिडीओमुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतलीच, सोबत आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हेही दाखवून दिले आहे.
निश्चल यांना त्यांच्या वडिलांनी स्वयंपाक शिकवला असून, आता त्यांच्या नातवाने त्यांना यूट्यूब चॅनेल सुरू करण्याची कल्पना दिली. वयाच्या ८५ व्या वर्षी विजय निश्चल यांचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आठ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
सध्या निश्चल यांच्या व्हायरल होणाऱ्या भन्नाट व्हिडीओमध्ये त्या बिना अंड्याच्या केकची रेसिपी दाखवत असताना ड्रेक नावाच्या एका पाशात्य गायकाच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी व्हिडीओ आणि निश्चल यांचे प्रचंड कौतुक केल्याचे, व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियांवरून समजते. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @dadikirasoi01 या हँडलवरून शेअर केला असून, याला १.१ व्ह्यूज प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा : बापरे! जगातील सर्वांत मोठे सँडविच जवळपास १९० किलोचे! पाहा थेट गिनीज बुकात झाली नोंद….
आता या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कशाप्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहा.
एकाने, “या आजीबाई आताच्या तरुण मंडळींपेक्षा जास्त कूल आहेत.” तर दुसऱ्याने, “यार, या आजीची नातवंडं किती नशीबवान आहेत”, अशी कमेंट केली आहे. तिसऱ्याने, “रेसिपीआधी शायरी तर व्हायलाच हवी”, असे म्हटले आहे. “आजीने केलेला डान्स फारच गोड होता”, असे चौथ्याने म्हटले, तर शेवटी पाचव्याने, “आता केवळ आजीची ही शायरी मला बरे करू शकते”, असे म्हटले आहे.
आपली आवड, आपले छंद तुम्ही कोणत्याही वयात जोपासू शकता असे या पूर्वीदेखील रवी बाला नावाच्या एका आजीने आपल्या नृत्यातून दाखवून दिले होते. त्यांच्या नृत्याच्या व्हिडीओमधून वय हा केवळ एक आकडा असतो, त्यामुळे आपले छंद जोपासण्यासाठी वयाची मर्यादा अजिबात नसते असे अगदी स्पष्टपणे दिसते.
@ravi.bala.sharma असे रवी बाला यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे नाव असून, यांना सोशल मीडियावर ‘डान्सिंग दादी’ या नावानेदेखील ओळखले जाते.