कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही असं म्हणतात, शिवाय आपण सोशल मीडियावर अशा बातम्या वाचत असतो, ज्यामध्ये अनेक लोक रात्रीत करोडपती बनल्याचं पाहायला मिळतं. सध्या अशाच एका व्यक्तीचे नशीब काही क्षणात पालटलं असून तो करोडपती बनला आहे. महत्वाची बाब म्हणजे तो करोडपती बनायला रद्दी कारणीभूत ठरली आहे. त्याला घरातील रद्दीत करोडो रुपयांचा खजिना मिळाला ज्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण हा खजिना सोने किंवा चांदी नसून त्याच्या वडिलांचे ६० वर्षांपूर्वीचे बँक पासबुक आहे. हे पासबुक या व्यक्तीला करोडपती बनवायला कारणीभूत ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिली येथे राहणारा एक्सेकिल हिनोजोसा घराची साफसफाई करत असताना त्याला काही रद्दी सापडली ती पाहिल्यानंतर तो ती खराब आहे म्हणून फेकून देणार होता. मात्र त्याने बारकाईने पाहिले असता त्याच्या वडिलांचे ६० वर्षापूर्वीचे बँक पासबुक असल्याचं समजले. पण या बँक खात्याची माहिती त्याच्या वडिलांशिवाय इतर कोणालाच नव्हती. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.
एक्सेकिलच्या वडिलांनी घर खरेदी करण्यासाठी १९६०-७० मध्ये बँकेत सुमारे १.४० लाख पेसो (चिली चलन) जमा केले होते. ज्याची सध्याची किंमत डॉलरमध्ये १६३ आणि भारतीय रुपयांमध्ये १३,४८० होती. पण त्यावेळच्या तुलनेत ती मोठी रक्कम होती. एक्सेकिलच्या आनंदाला तेव्हा ग्रहण लागले जेव्हा त्याला ती बँक फार पूर्वीच बंद पडल्याचं समजलं. शिवाय अनेक लोकांकडे त्या बँकेचे पासबुक होते, त्यामुळे आता ते पैसे मिळणे अशक्य असल्याचं त्याला वाटले. पण त्याचवेळी एक्सेकिलची नजर पासबुकवर लिहिलेल्या एका शब्दावर पडली, ज्यामध्ये ‘स्टेट गॅरंटीड’ लिहिले होते, ज्याचा अर्थ असा की, बँक पैसे देऊ शकली नाही तर सरकार ते पैसे देईल. मात्र एक्सेकिलने या पैशाची मागणी वर्तमान सरकारकडे केली असता सरकारने पैसे देण्यास नकार दिला.
न्यायालयीन लढाई लढावी लागली –
त्यामुळे एक्सेकिलकडे कायदेशीर लढाई लढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्याने सरकारच्या विरोधात खटला दाखल केला आणि न्यायालयात युक्तिवाद केला की, “हे पैसे आपल्या वडिलांनी कष्टाने कमावलेला आहे आणि सरकारने ते परत करण्याची हमी दिली होती”. युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने सरकारला व्याज आणि महागाई भत्त्यासह १ अब्ज पेसो म्हणजेच १.२ मिलियन डॉलर्सची रक्कम परत करण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिले. ज्यामुळे एक्सेकिल करोडपती बनला.