आपले वडील कितीही मोठ्या पदावर असू देत; पण त्यांच्यासोबतचे भावनिक नाते कधीही बदलत नाही. अशाच प्रकारचे एका अंतराळवीराचे त्यांच्या मुलासोबतचे भावनिक नाते पाहायला मिळाले. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी सध्या सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. नुकताच त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या मुलाशी संवाद साधला. दोघांमधील संवाद आता खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अंतराळवीर सुलतान यांचा मुलगा अब्दुल्ला सुलतान अल नियादी स्वत:ची ओळख करून देताना वडिलांना अभिवादन करतो. त्यानंतर तो त्यांन एक गोड प्रश्न विचारतो; ज्यावर वडिलांनी दिलेले उत्तर अनेकांना भावले आहे.
त्याने अंतराळ मोहिमेवर असलेल्या आपल्या वडिलांना विचारले की, त्यांना पृथ्वीवरील सर्वांत जास्त काय आवडते? ज्यावर अल नेयादी यांनी हसत हसत उत्तर दिले की, मला पृथ्वीवरील सर्वांत जास्त आवडती गोष्ट म्हणजे तू आहेस. मग ते पुढे म्हणाले की, परंतु जर तुला मला अंतराळात काय आवडते, असे विचारायचे असेल. तर, तुम्हाला माहीतच आहे की, आम्ही येथे मायक्रोग्रॅव्हिटी वातावरणात आहोत. आम्ही आवडतील अशा अनेक गोष्टी येथे करू शकतो. आम्ही सर्व काही करू शकतो, जसे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे.
वडिलांनी अंतराळातून केला कॉल
या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडीओ मोहम्मद बिन रशीद स्पेस सेंटरने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांच्या मुलाने “अ कॉल फ्रॉम स्पेस” – उम्म अल क्वाइन एडिशन या कार्यक्रमादरम्यान त्यांना एक प्रश्न विचारला की, पृथ्वीवर तुम्हाला सर्वांत जास्त काय आवडते?”
समोर आलेल्या काही बातम्यांनुसार, डॉ. अल नेयादीचे वडील आणि त्यांच्या सहा मुलांपैकी दोन मुलांनी उम्म अल क्वाइनमध्ये अंतराळवीरांच्या ‘अ कॉल फ्रॉम स्पेस’ कार्यक्रमात भाग घेतला होता; ज्यामध्ये त्यांनी अंतराळातील स्टेशनवरून राज्य आणि अंतराळप्रमुखांशी संवाद साधला.
‘आमच्या अमिराती मित्रांचे अभिनंदन’
या हृदयस्पर्शी व्हिडीओवर युजर्सनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, ‘मुलाला त्याच्या वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, दोघांमधील सुंदर संवाद. तर तिसऱ्या युजरने लिहिलेय की, सुंदर… या प्रसंगी आमच्या अमिराती मित्रांचे अभिनंदन!
१ सप्टेंबर रोजी होईल मिशन पूर्ण
४२ वर्षीय अंतराळवीर आणि त्यांचे चार सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर सहा महिन्यांची विज्ञान मोहीम पूर्ण करून १ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू करणार आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये मिस्टर नेयादी हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS)मधून बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्पेसवॉक पूर्ण केला. अशा प्रकारे ते अभियान ६९ दरम्यान स्पेसवॉक करणारे पहिले अरब व्यक्ती बनले.