Vaishnavi Hagawane video viral: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली असतानाच, आरोपी शशांक हगवणे आणि वैष्णवीचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा हुंडाबळीची चर्चा सुरू झाली. ५१ तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम दिल्यानंतरही वैष्णवीचा तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू होता. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या लग्नाचा अवघ्या दोन ते तीन वर्षांत दुर्दैवी अंत झाला. मात्र, त्यानंतर वैष्णवीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये तिचं तिच्या नवऱ्यावर किती प्रेम होतं, हे स्पष्ट होतंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वैष्णवी छान नटली आहे, यावेळी वैष्णवीचा पती शशांक तिच्या भांगेत कुंकू भरत आहे. दरम्यान यानंतर वैष्णवीच्या कृतीनं लक्ष वेधलंय. पतीनं कुंकू लावल्यानंतर वैष्णवी शशांकच्या पाया पडताना दिसत आहे. त्यांचा हा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सर्वजण आरोपी शशांकवर टीका करत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान यावेळी या व्हिडीओला “एका वाघाची शिकार एका हरणीने केली” हा गाणं लावण्यात आलं आहे. याआधी वैष्णवीनं घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओनंही लक्ष वेधून घेतलं होतं.
पाहा व्हिडीओ (Vaishnavi Hagawane video)
Vaishnavi Hagawane वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा आणि दीर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.१६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात वैष्णवीचे सासरे आणि दीर हे दोघंही फरार झाले होते ज्यांना आठ दिवसांनी अटक करण्यात आली. आता या प्रकरणात वैष्णवीचा सासरा, दीर, नवरा, सासू आणि नणंद यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता. तो विरोध पत्करुन वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिच्या घरातल्यांनी थाटात तिचं लग्न करुन दिलं होतं. मात्र शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वैष्णवीच्या वडिलांनी २०२३ मध्ये मुलगी वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटलं होतं. पोलीस तक्रारही केली होती.