शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा शिंदे गट व भाजपाने एकत्रित येत सरकार स्थापन केलं. आता विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील ११ दिवसांपासून राज्याबाहेर असलेले सर्व बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटी व अखेर गोवा या मार्गे पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. गोव्यातील हॉटेल ताजमधून गोव्याच्या विमानतळावर जातानाचा या आमदारांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक आमदार एकनाथ शिंदे यांना “साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी” असं म्हणताना दिसत आहे. या आमदाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर सातत्याने बंडखोर आमदारांची एकी दाखवण्यासाठी वेळोवेळी आपले व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केले आहेत. यात काही व्हिडीओंमध्ये बंडखोर आमदारांनी आपल्या मतदारसंघाचा निधी, हिंदुत्व असे मुद्दे उपस्थित करत मविआमधील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काही व्हिडीओ हे आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये कसे आरामात राहत आहेत, नाचत आनंद साजरा करत आहेत याचेही आहेत. मात्र, आत्ताच्या व्हिडीओत बंडखोर गटाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे आमदार मोठ्या आत्मविश्वासाने मुंबईकडे येताना दिसत आहेत.

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

हा व्हिडीओ गोव्याहून मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बसमधील आहे. त्यात कोणकोणते आमदार येत आहेत हे दिसत आहे. यात एकनाथ शिंदेंपासून बच्चू कडूंपर्यंत अनेकांचा समावेश आहे. व्हिडीओत काही आमदार आनंदाने हातवारे करत आहेत, बोलत आहेत, तर काही आमदार शांतपणे बसमध्ये बसलेले दिसत आहे. व्हिडीओ काढणारा बसच्या सुरुवातीपासून शुटिंग करतो आणि पुन्हा मागच्या बाजूने पुढे येत व्हिडीओ संपवतो.

व्हिडीओ संपतानाच शेवटी मागाठणे मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे यांना आपली एकनिष्ठा सांगत आहेत. यात ते “साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी” असं म्हणत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. अशास्थितीतही मी तुमचा फोटो असणारा बॅनर मुंबईत लावल्याचं बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंना सांगत आहेत.

हेही वाचा : आशिष शेलार यांची एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर लगेचच शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केला आणि रात्रीतून सुरत गाठलं. यानंतर राज्यात एकच राजकीय भूकंप झाला. पुढे हे बंडखोर आमदार थेट गुवाहाटीत गेले. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार अल्पमतात येऊन पडलं. याच संधीचा फायदा घेत भाजपा आणि बंडखोर शिंदे गटाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. याच सरकारला आता विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. यासाठीच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह अपक्ष आमदार गोव्याहून मुंबईत दाखल होत आहेत.