बेरोजगारी हा भारतासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने उपलब्ध रोजगार अपुरे पडत आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही. दिवसेंदिवस बेरोजगार लोकांचा आकडा वाढतोच आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगली नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगार तरुणांच्या कंपनीबाहेर नोकरीसाठी रांगा लागत आहे. सध्या पुण्यात एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पुण्यातील एका ठिकाणी नोकरीसाठी बेरोजगार तरुणांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे.
अर्थव दलाल नावाच्या तरुणाने एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील अनेकांना भेडसावत असलेल्या रोजगाराच्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकतो. एक्सवर दिलेल्या माहितीनुसार पुण्यात नोकरी शोधणाऱ्या अर्थवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवाजी नगरमधील एका कन्सल्टन्सी फर्मबाहेर प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येते.
नोकरी मेळाव्यासाठी पुण्याला गेलेला अथर्व कन्सल्टन्सी फर्ममध्ये जमलेल्या प्रचंड संख्येने थक्क झाला. त्याने आपला अनुभव एक्सवर व्हिडीओ पोस्ट करून शेअर केला. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले “तुम्ही तुमच्या कामाबद्दल समाधानी नसाल तर हा व्हिडिओ पहा. नुकतेच मी पुण्याला एका जॉब फेअरसाठी गेलो होतो, आणि जेव्हा मी पाहिलं, तेव्हा हे सर्व विद्यार्थी इथे एकच नोकरी मिळवण्यासाठी आले होते आणि पगार १५ हजारांपेक्षा कमी होता.
अथर्वने पुढे सांगितले की, ” मी खरं सांगतो, जितके लोक आले त्यापैकी फक्त३-४जणांच्या मुलाखती झाल्या आहेत.चांगली कौशल्ये आत्मसात करा नाहीतर बाहेरचं जग पाहिल्यानंतर जगणं अवघड होईल. जेवढं झोकून देऊन काम करता येईल तेवढं बरं. घरी बसून तुम्ही जे काही शिकत आहात त्याबाबत आणखी ज्ञान आत्मसात करा. नाहीतर असे होऊ शकते भाऊ”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे .व्हिडीओ पाहून अनेकांना डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “भाऊ, तू मस्करी करतोय का?”
पुण्यात घडलेली ही घटना जानेवारी २०२४ मधील आणखी एका व्हायरल घटनेची आठवण करून देते, जिथे हिंजवडीमध्ये हजाराहून अधिक नोकरी शोधणाऱ्यांनी तरुणांची रांगा लागली होती. तेव्हा देखील असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे३७ आयटी कंपन्या महाराष्ट्रा बाहेर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अर्थात त्यामुळे पुण्यातील रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे.