Indian Auto Driver Speaks French : भारतामध्ये नेहमीच काहीतरी वेगळं घडतं आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचतं. नुकत्याच घडलेल्या एका व्हिडीओनं लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय रिक्षा चालक परदेशी पर्यटकासोबत अगदी सहज आणि प्रवाही फ्रेंच भाषेत संवाद साधताना दिसतो. हे दृश्य पाहून अनेक नेटिझन्स थक्क झाले आहेत आणि त्या रिक्षा चालकाचे कौतुक सोशल मीडियावर ओसंडून वाहत आहे.

हा व्हिडीओ एका परदेशी इन्फ्लुएन्सरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. तो सध्या भारतात प्रवास करीत आहे. त्याला साधारण रिक्षाची राईड घ्यायची होती; पण त्या प्रवासात घडलेली ही घटना त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरली.

व्हिडीओमध्ये दिसतं की, रिक्षा चालक पर्यटकाला विचारतो, “तुम्ही कोणती भाषा बोलता?” पर्यटक उत्तर देतो, “फ्रेंच.” इतकं ऐकताच ड्रायव्हर ताबडतोब फ्रेंचमध्ये संवाद सुरू करतो. त्याचा आत्मविश्वास, सहजता व बोलण्यातली गोडवा पाहून प्रवासी अवाक होतो. त्यानं थोडं गमतीत विचारलं, “तुला खरंच फ्रेंच येतं?” त्यावर ड्रायव्हर हसून उत्तर देतो, “थोडं थोडं… पण शिकतोय.”


पाहा व्हिडिओ

रिक्षा चालकाचं एक वाक्य मात्र विशेष लक्षवेधी ठरलं. त्यानं फ्रेंच भाषेत म्हटलं – Little by little, the bird makes its nest म्हणजेच “थोडं थोडं करीत पक्षी आपलं घरटं तयार करतो.” या म्हणीतून त्याचा शिकण्यातली धडपड आणि सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला.

हा साधा संवाद नेटिझन्सना फार भावला. अनेकांनी त्यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. कुणी लिहिलं, “याला फक्त पाच सेकंद लागली भाषा डाऊनलोड करायला.” तर कुणी म्हणालं, “ब्रोने स्कॅन करून थेट फ्रेंच पॅक अॅक्टिव्हेट केला.” काहींनी तर गमतीत म्हटलं, “लेजेंड म्हणतो – ड्रायव्हरनं फ्रेंच लँग्वेज पॅक डाऊनलोड केला.”

हा अनुभव सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. विशेष बाब म्हणजे या छोट्याशा संवादामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली की – भारतातील प्रत्येक व्यक्तीची कथा वेगळी असते. रिक्षा चालका म्हटलं की, फक्त भाडं घेणारा चालक, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण, अशा प्रसंगांमुळे त्यांचं ज्ञान, जिद्द व वेगळेपण समोर येतं.

सोशल मीडियावरील अनेकांनी या घटनेचं कौतुक करीत म्हटलं, “भारतामध्ये साध्या साध्या क्षणांतून जगभरात स्मित पसरवणाऱ्या गोष्टी घडतात.” या घटनेमुळे भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती पुन्हा एकदा उजेडात आली. आजच्या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे कोणताही व्हिडीओ क्षणात जगभर पोहोचतो; पण लोकांच्या हृदयात घर करणं सोपं नसतं. या रिक्षा चालकाला मात्र एका भाषेच्या माध्यमातून केवळ प्रवाशाचं मनच जिंकलं नाही, तर जगभरातील लोकांचं लक्ष वेधलं आहे. ही घटना एकच संदेश देते – भाषा, संस्कृती व ओळख यांची बंधने तोडून संवाद साधला की, जग अधिक सुंदर वाटतं.