Viral Video Mumbai Woman Shouts At Railway Collector : गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन चढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. प्रवासासाठी १० रुपयाचे तिकीट काढणे अनेक प्रवाशांना नकोसे वाटते. मग टीसीने पकडल्यावर न पटणारी आणि चुकीची कारणे देऊन दंड भरण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ते कुठच्याही थराला जातात. आज सोशल मीडियावर एक महिला, तिकीट तपासणीदरम्यान कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांवर ओरडताना, रडताना आणि वाद घालताना दिसली आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील ठाणे या रेल्वेस्थानकाच्या पादचारी पुलावरचा हा व्हिडीओ आहे. कदाचित वैध तिकीट नसल्यामुळे महिला टीसीला बघून पळून जात असते, तितक्यात टीसी तिला थांबवतो. एका अज्ञात पुरुषाने तिची बॅगसुद्धा पकडली आहे. हा सगळा गोंधळ पाहून आरपीएफ अधिकारी ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करून महिलेला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. पण, तिकीट दाखवण्यास आणि दंड भरण्यास सांगितल्यामुळे तिचा राग अनावर झालेला असतो. बोलताना तिच्या डोळ्यांत पाणी असते, इथून बाहेर कसे पडावे हे तिला कळतच नसते. तरीही ती टीसीकडे बघून “मी पळत नव्हते, माझी अवस्था बघा, मला तुमचा QR कोड द्या, मला घाई करावी लागेल”; असे ती सतत घाई-गडबडीत म्हणताना दिसते आहे.
अनेकदा काही प्रवासी तिकीट नसूनही मुद्दाम स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करत असतात. तिकीट नसेल तर पैसे (फाईन) भरा आणि पुढच्या वेळी लक्षात ठेवा, ही साधी गोष्ट कधीकधी प्रवाशांना कळत नाही. पण, पैसे आणि वेळ वाचवण्याच्या नादात ते टीसीशी वाद घालायला सुरुवात करतात आणि परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाते. व्हायरल व्हिडीओतसुद्धा हेच घडले आहे; ज्यामुळे सोशल मीडियावरही महिलेच्या वागणुकीबद्दल वेगवगेळी मते मांडली जात आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @NCMIndiaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचारी शांत राहून तिला समजावून सांगत आहेत.. पण, महिला तिकीट नसूनही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महिलेवर कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आली आहे की नाही याबद्दलची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. पण, नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून “तिकीट असेल तर दाखवा नाही तर पैसे देऊन निघून जा”; असे व्हिडीओखाली कमेंटमध्ये आवर्जून म्हणताना दिसत आहेत…