लोकांनी गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ सार्वजनिक ठिकाणी खाणं किंवा थुंकणं हे केवळ त्यांच्याच नाही, तर इतरांच्याही आरोग्यास हानिकारक आहे. त्याचबरोबर ही बाब शहर स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांनाही मोठ्या प्रमाणात खीळ घालण्याचं काम करतं. थुंकीच्या अशा जिकडे-तिकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या डागांमुळे जमीन, स्टेशन, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणं घाणेरडी होतात. हे केवळ नागरिकांच्या रोजच्या जीवनातच अडथळा आणत नाहीत, तर शहराची प्रतिमाही खराब करतात. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे, ज्यात पाटणा मेट्रोच्या स्थानकावर गुटख्याचे लाल डाग पसरल्याचे दिसत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संस्कार आणि जबाबदारी कमी असल्याचे दिसून येते.

बिहारमध्ये काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते पाटणा मेट्रोच्या ३.४५ किमी उंच मार्गिकेचे उदघाटन करण्यात आले. आधुनिक सोई-सुविधांनी सजलेली ही मेट्रो सेवा बिहारच्या विकासाचे प्रतीक मानली जात असतानाच अवघ्या दोन-तीन दिवसांतच तिचे विद्रूप रूप समोर आले आहे. सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे नागरिकांचीही मान लाजेने खाली जाईल, असे चित्र उघडकीस आले आहे.

पाटणा येथील व्लॉगर रौनक अग्रवाल यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रो स्टेशनच्या पायऱ्या, रेलिंग, प्लॅटफॉर्म, फरशी आणि अगदी ट्रॅकवरही लाल गुटख्याचे डाग पसरलेले दिसतात. प्रवाशांनी मेट्रो स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी थुंकून ठेवल्याचे पाहून अग्रवाल रागावले आणि म्हणाले – “मेट्रो सुरू होऊन फक्त दोन दिवस झालेत आणि बघा, ‘गुटखा गँग’ पोचलीच! सरकार इतकं चांगलं काम करतंय आणि तुम्ही ते खराब करताय. थोडी तरी लाज बाळगा, बिहारच्या लोकांनो!

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटिझन्समध्ये चर्चा रंगली. काहींनी व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्लॉगरलाच दोष देत लिहिलं, “हा मुलगा बिहारची बदनामी करतोय!” तर अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करीत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. एका युजरने सुचवले – “स्टेशनवर सर्वत्र कॅमेरे लावा आणि जो थुंकेल, त्यालाच साफ करायला लावा. शिक्षा मिळेपर्यंत शहाणपण येणार नाही.” आणखी एका युजरने,“मेट्रो परिसरात सरळ गुटखाबंदी करा”, अशी ठाम मागणी केली.

दिवसातून सकाळी ८ ते रात्री १० या वेळेेत मेट्रो सेवा सुरू असून, २० मिनिटांच्या अंतराने गाड्या धावत आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रकल्पाच्या स्वच्छतेचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने पायाभूत सुविधा उभारल्या; पण नागरिकांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे ?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून एकच विचार मनात येतो – विकासाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी रूळ, स्टेशन आणि गाड्या पुरेशा नाहीत, तर संस्कार आणि शिस्तही लागते.