Viral video: भारतामध्ये आजकाल बहुतेक लोक डिजिटल पेमेंट म्हणजेच फोन पे, गूगल पे वगैरे वापरतात. पण, कधी कधी हे पेमेंट फेल झालं, तर त्यातून मोठा त्रास होऊ शकतो. असंच काहीसं मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वेस्थानकावर घडलं. ट्रेन थांबली असताना एक प्रवासी समोसे खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला. त्याने मोबाईल फोनने पैसे देण्याचा प्रयत्न केला; पण पैसे मिळाले नाहीत. ट्रेन निघत असल्याने, तो समोसे सोडून परत ट्रेन पकडण्यासाठी धावला; पण समोसा विक्रेत्यानं त्याला कॉलरने पकडून थांबवले आणि पैसे देण्याचा आग्रह केला.

ट्रेन सुटत असल्यानं त्या प्रवाशाला काय करावं कळेना म्हणून त्यानं झटक्यात आपलं स्मार्ट वॉच काढून विक्रेत्याच्या हातात दिलं आणि मगच त्याला सोडलं गेलं. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आणि आता सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. लोक यावरून म्हणत आहेत, “पेमेंट फेल झालं म्हणून कोणाला असं अडकवणं योग्य आहे का?

१७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जबलपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एक प्रवासी ट्रेनमधून उतरून समोसे विकत घेण्यासाठी स्टॉलजवळ गेला. त्याने घाईतच फोन पेवरून पैसे देण्याचा प्रयत्न केला; पण अॅप चाललं नाही. ट्रेन सुटत असल्याचं पाहून तो समोसे तसेच ठेवून परत ट्रेनमध्ये बसायला धावला; पण समोसा विक्रेत्यानं त्याला कॉलर पकडून अडवलं आणि “पैसे देऊनच जा” असं म्हणत पुढे जाऊ दिलं नाही. शेवटी प्रवाशाला आपलं स्मार्ट वॉच काढून विक्रेत्याच्या हातात द्यावं लागलं, तेव्हा तो त्याला दोन प्लेट समोसे देऊन सोडून देतो. आजूबाजूचे इतर प्रवासी हे सगळं पाहून आश्चर्यचकित झाले. काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला आणि तिथूनच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी लिहिलं, “केवळ पेमेंट फेल झालं म्हणून एखाद्याला असं अडवणं म्हणजे सरळ गुंडगिरीच झाली. ”काहींनी प्रश्न विचारला, “जर पैसे गेले नाहीत, तर लोकांना असं पकडून ठेवायचं का?” तर काहींनी नाराजी व्यक्त करीत म्हटलं, “रेल्वेस्टेशनसारख्या ठिकाणीच प्रवासी सुरक्षित नसतील, तर मग लोकांनी कुठे विश्वास ठेवायचा?”

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं लगेच कारवाई केली. जबलपूरच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितलं की, संबंधित समोसा विक्रेत्याला RPF ने अटक केली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा स्टॉल चालवण्याचा परवाना रद्द करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे विभागानं सांगितलं की, भविष्यात अशा प्रकारचे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.