Video Shows Grandfather Drop His Granddaughter At School On Cycle : आजी-आजोबांबरोबर मोठी झालेली नातवंडे लकी असतात असं म्हणतात. आजीने एकदा तरी प्रेमाने अंघोळ घातली किंवा आजोबा एकदा तरी शाळेत सोडायला आले तर आयुष्यभर ती गोष्ट लक्षात राहते. आजी-आजोबांनी दिलेलं प्रेम आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाचा आपण आयुष्यभर केलेला आदर कदाचित हेच नातवंडे आणि आजी-आजोबांच्या नात्याचा खरा अर्थ आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये आजोबा नातीला शाळेत सोडायला चालले आहेत.
व्हायरल व्हिडीओत भर उन्हात आजोबा आपल्या नातीला घेऊन शाळेत सोडायला चालले आहेत. तिच्या भविष्यासाठी, स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता , भर उन्हात नातीला सायकलवरून घेऊन चालले आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की, आजोबांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तिने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली आहे. हा क्षण दाखवतो की, आजी-आजोबा व नातीच्या नात्यामध्ये प्रेम, आदर आणि काळजी दडलेली असते. आजोबांची शाळेत नेण्यासाठीची धडपड आणि नातीने सावली देऊन त्यांचे केलेले संरक्षण पाहून तुम्हीही भारावून जाल.
तो दिलासा, ते संरक्षण, ते प्रेम (Viral Video)
अनेकदा गावाकडे आजही मुलींना शिक्षण घेण्यास बंदी आहे. पण, आजोबा कडक उन्हात संघर्ष करून तिच्या शिक्षणाला प्राधान्य देताना दिसत आहेत. तसेच आजोबांची होणारी दगदग अगदी त्या चिमुकलीपासून लपली नाही आणि सायकलवर मागे उभी राहून तिने आजोबांच्या डोक्यावर छत्री धरून प्रेमाने त्यांचे संरक्षण केले आहे. त्यामुळे दयाळूपणा वय किंवा परिस्थीवर अवलंबून नसते याची एक हृदयस्पर्शी आठवण हा व्हिडीओ करून देतो आहे. एकदा बघाच आजी व नातीचा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @inspiringlion या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “तीने दोन्ही हातांनी छत्री कशी धरली बघा” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “त्यांच्या नात्याचा गाभा म्हणजे संरक्षण, एका बाजूने नाही तर दोन्हीकडून. एकीकडे नातीची सुरक्षा तिच्या आजोबांबरोबर गेल्याने दिसते आहे आणि आजोबांना नातीच्या हाताने मिळणारी सावली त्यांच्यातील प्रेम दाखवत आहे”, “आजी-आजोबांसोबतचे नाते खूप खास असते.. सर्वात प्रेमळ, सर्वात प्रिय,आजी-आजोबांकडून मिळणारा तो दिलासा, ते संरक्षण, ते प्रेम एका वेगळ्याच पातळीचा असतो” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.