Vande Bharat Staff Fight Video : वंदे भारत ट्रेनचे आकर्षण अनेक प्रवाशांना असते. सामान्य ट्रेनपेक्षा या ट्रेनमध्ये अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवाशांना प्रवास करणे सोईस्कर वाटते. पण, वंदे भारत ट्रेनची दुसरी बाजू म्हणजे अनेकदा येथे व्यवस्थित जेवण मिळत नाही वा दूषित जेवण मिळते, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात असतात. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो कदाचित सगळ्यांनाच थक्क करून सोडणारा आहे.

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर वंदे भारत ट्रेनचे पॅन्ट्री असिस्टंट्स (pantry assistants) किंवा कर्मचारी एकमेकांवर कचराकुंडी फेकताना, बेल्ट आणि लाथा-बुक्क्यांनी मारामारी करताना दिसत आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमध्ये पाण्याचा बॉक्स ठेवण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पॅन्ट्री असिस्टंट्समध्ये (pantry assistants) हाणामारीची घटना घडली. सुरुवातीला फक्त शाब्दिक वाद झाला. पण, नंतर तो शारीरिक भांडणात बदलला. मात्र, कर्मचाऱ्यांनी अधिकृत तक्रार केली नाही आणि हा मुद्दा दोघांच्या सहमतीने लेखी स्वरूपात मिटवला गेला. पण, ही घटना स्पष्टपणे भारतीय रेल्वे कायद्याअंतर्गत येते. त्यामुळे १७/१०/२५ रोजी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक पोलिसांनी FIR क्रमांक ७४/२५, कलम १९४(२) बीएनएस अंतर्गत तक्रार नोंदवून घेतली आहे.

५ लाख रुपयांचा दंड (Viral Video)

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने म्हटले आहे की, या प्रकरणाकडे खूप गांभीर्याने पाहिले जात आहे आणि चार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून सुद्धा टाकण्यात आले आहे आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि ५ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @theskindoctor13 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “वंदे भारत कॅटरिंग कर्मचारी एकमेकांवर मारामारी करत आहेत. असं वाटतं की, ही नवीन सेवा सुधारण्याची पद्धत आहे. निघण्याआधी कर्मचारी एकमेकांना मारून शांत होतात, जेणेकरून प्रवाशाने जास्त पैसे घेतल्याबद्दल त्यांना मारावं लागणार नाही” ; अशी विनोदी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.