हॉटेल्समध्ये फायर अलार्म असतात हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊक असेल; ज्यामुळे तुम्हाला सिगारेट किंवा कोणतीही ज्वलनशील गोष्ट हॉटेलमध्ये वापरता येत नाही. पण एका हेअर ड्रायरच्या वापरामुळेही हॉटेल तुमच्याकडून दंड वसूल करते, असे कधी तुम्ही ऐकले आहे का? परंतु, ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलने हेअर ड्रायर वापरला म्हणून ग्राहकाकडून दंड वसूल केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. एका महिला ग्राहकाने केसांची स्टाईल सेट करण्यासाठी हॉटेलमध्ये हेअर ड्रायर वापरला; ज्यामुळे दंड म्हणून तिच्याकडून १ लाख १० हजार रुपये वसूल करण्यात आले,
केली (बदललेले नाव) शनिवारी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे एका कॉन्सर्टसाठी गेली होती. तेथे तिने तेथील ‘नोवोटेल पर्थ लँगली’ हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूम बुक केली होती. रूममध्ये कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी तयार होताना तिला हेअर ड्रायरचा वापर करायचा होता. पण, हेअर ड्रायरची पिन स्विच बोर्डवरील सॉकेटमध्ये लावताच हॉटेलमध्ये फायर अलार्म वाजू लागला. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाची टीम तिच्या खोलीत पोहोचली. मात्र आग लागली नसल्याचे समजताच पथक तातडीने परत गेले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी केलीने हॉटेलमधून चेक आउट केले. त्यानंतर तीन दिवसांनी तिला समजले की, हॉटेलने तिच्या खात्यातून सुमारे १ लाख १० हजार रुपये परस्पर कापलेत. हे लक्षात आल्यावर तिला राग आला तिने लगेच हॉटेल व्यवस्थापनाकडे याबाबत चौकशी केली; ज्यामध्ये हेअर ड्रायरमुळे वाजलेल्या फायर अलार्ममुळे तिला हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हॉटेलने कापले अतिरिक्त पैसे
केली यांच्या मते, हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे २४० डॉलर्स (अंदाजे रु. १६,०००) होते. तसेच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने आपत्कालीन व फायर अलार्मसाठी केलीला १३३७ डॉलर्सचा दंड ठोठावला होता. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्यानंतरही हॉटेलने तिच्या खात्यातून ६३ डॉलर (सुमारे ५,२०० रुपये) जास्त घेतले होते.
त्यानंतर केलीने दिवसभर हॉटेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. तिने हॉटेलमध्ये अनेक कॉल केले. त्यानंतर त्याला रिसेप्शनवरून समजले की, हे हॉटेलच्या ‘टर्म्स अॅण्ड कंडिशन’मध्ये आहे. त्यावर केलीने हॉटेलला विचारले की, टोस्ट जळाल्यावर फायर अलार्म वाजला तरी ते ग्राहकांकडून पैसे घेतील का? अखेर बऱ्याच युक्तिवादानंतर केलीला दंड म्हणून घेतले गेलेले अतिरिक्त पैसे परत मिळाले.
‘पर्थ नाऊ न्यूज’ आरटीआयनुसार २०१५ मध्ये कोणत्याही कारणाविना फायर अलार्म वाजल्यास दंड ठोठावण्याचा नियम लागू करण्यात आला. कारण- फायर आणि आपत्कालीन सेवा विभागाचे अशा खोट्या फायर अलार्ममुळे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मालमत्तेच्या पहिल्या तीन खोट्या फायर अलार्मसाठी कोणताही दंड नसला तरी मालमत्तेच्या मालकाला वर्षातील चौथ्या खोट्या अलार्मसाठी दंड भरावा लागतो. या प्रकरणात केलीच्या बाबतीत हेच घडले; ज्यामुळे हॉटेलमालकाने ग्राहकाकडून दंड वसूल केला. पण, ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा केलीच्या अकाउंटमधून कापली गेलेली रक्कम जास्त होती.