03 April 2020

News Flash

बॅरियाट्रिक सर्जरी : नवा दृष्टिकोन

मात्र इतर अनेक वैद्यक क्षेत्रांप्रमाणे बॅरियाट्रिक सर्जरीमध्येही अव्याहत सुधारणा होतच होती.

बॅरॉस म्हणजे वजन आणि इयाट्रिक म्हणजे कमी करणारी! बॅरियाट्रिक सर्जरीला केवळ ‘कॉस्मेटिक’ म्हणजे सौंदर्य वाढवणारी सर्जरी असे न संबोधता मेटाबोलिक सर्जरी म्हणजे रुग्णाचा बिघडलेला चयापचय दुरुस्त करणारी शस्त्रक्रिया असा दर्जा अलीकडेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात आला

आपण सारे आशियायी वंशाचे भारतीय. जोपर्यंत श्रमप्रधान साधी राहणी होती, तोवर ठीक होतो. पण वांशिक गुणधर्मात भर पडली सदोष जीवनशैलीची, जिचा थेट परिणाम म्हणजे धोकादायक पद्धतीने वाढत चाललेला लठ्ठपणा आणि त्यातून उद्भवणारी मधुमेह, रक्तातला मेद, हृदयविकार, यकृत आणि पित्ताशय विकार, इत्यादी दुष्ट मालिका. आहार, व्यायाम, औषधे वगैरेंनी या गोष्टी आटोक्यात ठेवता येतात, पण त्या बऱ्या होत नाहीत आणि आयुष्यभर सोबत करतात. लठ्ठपणा ही केवळ सौंदर्याला बाधा आणणारी गोष्ट नाही तर तो एक घातक रोग आहे आणि त्यावर ठोस, कायमस्वरूपी उपाय केलाच पाहिजे. अलीकडच्या काही वर्षांत एका नव्या उपचाराकडे संशोधकांचे लक्ष वेधले आहे आणि तो म्हणजे बॅरियाट्रिक सर्जरी.

१९७० साली पाश्चात्त्य देशात अति लठ्ठ माणसांसाठी प्रस्तुत झालेल्या या शस्त्रक्रियेने सुरुवातीला भरपूर कुतूहल जागृत केले. बॅरॉस म्हणजे वजन आणि इयाट्रिक म्हणजे कमी करणारी! यासाठी वेगवेगळ्या पद्धतींच्या कल्पक शस्त्रक्रिया शोधून काढल्या गेल्या. त्यामध्ये मुख्यत: दोन गोष्टींवर भर होता. एक, जठराचा आकार एवढा कमी करायचा की माणूस जास्त खाऊच शकणार नाही आणि दुसरी, आतडय़ाचा बराचसा भाग पचन-अभिशोषणाच्या क्रियेतून वगळून टाकायचा, जेणेकरून त्या व्यक्तीला खाल्लेले पचणार नाही आणि बरेच अन्न मळाच्या रूपाने बाहेर पडेल. या सर्व शस्त्रक्रियांमुळे निर्विवादपणे रुग्णाच्या वजनात लक्षणीय अशी घट होत असे, परंतु अनेक अनिष्ट परिणामांना तोंड द्यावे लागे. उदा. पोट गच्च होणे, मळमळ, उलटय़ा, दिवसातून अनेकदा मेदयुक्त शौचाला होणे, पित्ताशयाचे विकार, जीवनसत्त्वं आणि कॅल्शियम, लोह इत्यादीची कमतरता आणि अशक्तपणा! या गोष्टींमुळे दैनंदिन जीवनाची गुणवत्ता घसरून रुग्ण त्रासून जाई. त्यामुळे या पद्धती तेवढय़ा लोकप्रिय झाल्या नाहीत. समाजात लठ्ठपणा जरी वाढत चालला तरी अगदी कमालीच्या लठ्ठ व्यक्ती (ज्यांचा बॉडी मास इंडेक्स : बीएमआय ४० च्या पुढे आहे) सोडल्यास इतर लठ्ठ रुग्णांनी याकडे पाठ फिरवली. बरीचशी डॉक्टर मंडळीही याबाबतीत उदासीन राहिली.

मात्र इतर अनेक वैद्यक क्षेत्रांप्रमाणे बॅरियाट्रिक सर्जरीमध्येही अव्याहत सुधारणा होतच होती. वर वर्णन केलेले अनेक अनिष्ट परिणाम टाळता कसे येतील, यावर विचार चालू राहिला. रुग्णांची काळजीपूर्वक निवड, शस्त्रक्रियेपूर्वी विशिष्ट आहार-व्यायाम, सामान्य रुग्णांपेक्षा वेगळे भूल देण्याचे तंत्र, पोट न उघडता दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्यामुळे कमी झालेला रुग्णालयातला काळ आणि शस्त्रक्रियेनंतर काटेकोरपणे घेतली जाणारी रुग्णाच्या आहाराची काळजी या सगळ्या गोष्टींमुळे बरेच दुष्परिणाम टाळण्यात डॉक्टरांना यश मिळाले. १९७० पासून पुढच्या ३० वर्षांत बॅरियाट्रिक सर्जरी पाश्चात्त्य देशांत स्थिरावली. उच्चभ्रू आणि स्वत:च्या शरीरप्रतिमेबद्दल जागरूक असलेल्या मंडळींना ‘कॉस्मेटिक’ म्हणजे सौंदर्यवृद्धी करण्याचा उपाय म्हणून भावली.

याच सुमारास शल्यतज्ज्ञांच्या लक्षात एक अत्यंत विस्मयकारक गोष्ट आली. या लठ्ठ रुग्णांपैकी अनेकांना मधुमेह होताच, त्यामध्ये शस्त्रक्रिया झाल्यावर केवळ २-३ दिवसांमध्ये अचानकपणे घट आढळून आली. त्यांचे इन्शुलिनचे डोस एकदम कमी झाले, गोळ्या बंद कराव्या लागल्या. जवळजवळ ८० ते ९० टक्के रुग्णांत ही घटना दिसून आली. विशेष म्हणजे वजन कमी व्हायच्या आधीच हे बदल घडले. काही दिवसांत मधुमेहाशी संबंधित सर्व तपासण्या नॉर्मल येऊ लागल्या. जास्तीच्या वजनातली घट ७५ ते ६५ टक्के इतक्या प्रमाणात झाली. ही सुधारणा पुढची कित्येक वर्षे टिकून राहिलेली दिसली.

वास्तविक पूर्वी जेव्हा अल्सरच्या दुखण्यासाठी जठराची शस्त्रक्रिया करीत त्या वेळी रुग्णाचा मधुमेह अनपेक्षितरीत्या ‘बरा’ झाल्याचे निरीक्षण तत्कालीन शल्यतज्ज्ञांनी केले होते. पण त्याचा म्हणावा तितका पाठपुरावा झाला नव्हता. मात्र २००३ पासून जगभरातील अनेक बॅरियाट्रिक सर्जन्सनी या आश्चर्यकारक घटनेची नोंद ठेवायला सुरुवात केली. २००८-२००९ पासून याविषयीचे शोधनिबंध अनेक मान्यताप्राप्त वैद्यकीय नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागले. सुरुवातीच्या अनेक अभ्यासांत तीव्र लठ्ठपणा (बीएमआय ३५ ते ४०) असलेल्या रुग्णांचे निरीक्षण केले गेले. भारतात प्रथमच पुणे येथे तुलनेने कमी बीएमआय (३५ पेक्षा कमी) असणाऱ्या रुग्णांची बॅरियाट्रिक सर्जरी मधुमेहमुक्तीचा उद्देश ठेवून केली गेली. या अभ्यासातील १०० टक्के रुग्णांचा मधुमेह ‘बरा’ झाल्याचे दिसून आले. औषधोपचार बंद झाले. हे रुग्ण सर्वसामान्य भोजन घेऊ लागले. एवढेच नाही तर त्यांना असणारा हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळले. या क्रांतिकारक घटनेचा अहवाल २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

शस्त्रक्रियेनंतर वजन कमी होण्यापूर्वीच रक्तातील साखर कमी कशी येते? या प्रश्नाचे उत्तर संशोधक हॉर्मोन्सच्या भाषेत देतात. जठरपोकळी अशा पद्धतीने कमी केली जाते की जठरात एरवी स्रवणारे ‘भूक’ हॉर्मोन ‘ग्रेलिन’ नाहीसे होते. जठरातून लहान आतडय़ाच्या शेवटच्या भागात पटकन पोहोचलेल्या अन्नामुळे तिथे इन्क्रिटिन नावाचे हॉर्मोन्स स्रवतात, जी स्वादुपिंडावर अत्यंत अनुकूल परिणाम घडवतात. मेंदूमधील ‘पोट भरले’ ही संवेदना जागृत होते. अन्न कमी खाल्ले जाणे आणि अन्नाचे अभिशोषण कमी होणे या गोष्टी घडण्याआधीच या हॉर्मोन्सच्या बदलांमुळे मधुमेह झपाटय़ाने कमी होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

नव्याने उपलब्ध झालेली ही माहिती लक्षात घेऊन बॅरियाट्रिक सर्जरीला केवळ ‘कॉस्मेटिक’ म्हणजे सौंदर्य वाढवणारी सर्जरी असे न संबोधता मेटाबोलिक सर्जरी म्हणजे रुग्णाचा बिघडलेला चयापचय दुरुस्त करणारी शस्त्रक्रिया असा दर्जा अलीकडेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात आला. इतकेच नाही तर वैद्यक विम्यामध्ये जीवनदान देणारी शस्त्रक्रिया म्हणून हिचा अंतर्भाव केला पाहिजे अशी शिफारस तज्ज्ञांनी केलेली आहे.

पाश्चिमात्य मार्गदर्शक तत्त्वानुसार अति तीव्र स्थूल व्यक्ती (बीएमआय ४० च्या पुढे) आणि मध्यम स्थूल व्यक्ती (बीएमआय ३५ ते ४०) परंतु ज्यांना मधुमेह, उच्च रक्त दाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार इत्यादी त्रास आहे असे रुग्ण यांनी ही शस्त्रक्रिया करून घ्यावी. पण हेच निकष भारतीय लोकांना लावावेत का, असा प्रश्न आपल्या भारतीय डॉक्टरांना पडू लागला. याचे कारण असे की, भारतीय लोक दिसायला फारसे लठ्ठ नसले तरी त्यांच्या शरीरात अस्थी आणि स्नायूंपेक्षा मेद जास्त असतो. एवढेच नाही तर हा मेद शरीराच्या मध्य भागात म्हणजे उदरपोकळीत साठवून ठेवला जातो. या मेदातून अनेक विषारी द्रव्ये स्रवतात, ज्यामुळे शरीरातील इन्शुलिनला प्रतिरोध निर्माण होतो. त्यातूनच मधुमेह, रक्तवाहिन्या अरुंद होणे आणि तद्जन्य विकारांची साखळी सुरू होते. याचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडे भारतीय लोकांचे लठ्ठपणासंबंधीचे निकष खाली उतरवले आहेत. आज जागतिक मधुमेहाची राजधानी अशी ओळख मिळालेल्या भारतातील मधुमेहाची भीषण समस्या लक्षात घेता या बदललेल्या निकषानुसार बीएमआय ३५ पेक्षा कमी असणाऱ्या मधुमेही रुग्णांनाही बॅरियाट्रिक सर्जरीचा उपचार सुचवावा, असे एतद्देशीय डॉक्टरांना वाटू लागले आहे. कोणत्या रुग्णाला शस्त्रक्रिया सुचवावी यासाठी बीएमआयच्या पलीकडे जाऊन आणखी काही निकष ठरवले आहेत, ते असे- शरीरातील मेदाचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमरेचा घेर स्त्रियांमध्ये ८० से.मी.च्या वर आणि पुरुषांचा ९० से.मी.च्या वर, आणि शास्त्रीय तपासण्या करून सिद्ध झालेला इन्शुलिन प्रतिरोध. अशा रुग्णाला जर मधुमेह, हृदयविकार, रक्तातील मेद वाढणे, मूत्रपिंड खराब होणे, लघवीवर ताबा नसणे, नपुंसकता असे त्रास असतील तर योग्य समुपदेशनानंतर त्यांना बॅरियाट्रिक सर्जरीचा सल्ला द्यावा, या विचाराप्रत आता डॉक्टर आलेले आहेत.

शस्त्रक्रियेच्या अनेक पद्धतींचा अभ्यास केल्यावर त्यातून आदर्श समजली जाणारी शस्त्रक्रिया आज सर्वत्र केली जाते. तिची थोडक्यात माहिती अशी, संपूर्ण भूल देऊन पोटाला ३ लहान छिद्रे पाडून, दुर्बिणीतून जठराचा सुमारे ८५ टक्के भाग बंद होईल अशा प्रकारे स्टेपल लावून उरलेल्या १५ टक्के जठरपोकळीचे रूपांतर केळ्याच्या आकाराच्या एका टय़ूबमध्ये करतात. हा शस्त्रक्रियेचा पहिला भाग. काही रुग्णांच्या बाबतीत फक्त एवढीच शस्त्रक्रिया केली जाते. दुसऱ्या भागात जठरपोकळी लहान आतडय़ाच्या शेवटच्या भागाला जोडली जाते. यामुळे खाल्लेले अन्न जठरात न थांबता वेगाने लहान आतडय़ाच्या शेवटी जाऊन पोहोचते. या शस्त्रक्रियेनंतर १२ तासांनी रुग्ण पाणी पिऊ शकतो. पहिल्या आठवडय़ात केवळ पातळ द्रव पदार्थ दिले जातात. नंतर दुसऱ्या आठवडय़ात घट्टसर द्रव, तिसऱ्या आठवडय़ात अगदी मऊ शिजवलेले, मिक्सरमधून काढलेले घन पदार्थ आणि चौथ्या आठवडय़ात सर्वसामान्य जेवण असा आहार देतात. जठराची पोकळी कमी झाल्याने रुग्णाला वरचेवर थोडे थोडे खायला सांगतात. उच्च दर्जाची प्रथिने, बी-१, बी १२, डी व्हिटमिन्स, कॅल्शियम, लोह इत्यादी पूरक गोष्टी आवर्जून दिल्या जातात. रुग्णालयात ३-४ दिवस राहावे लागते.

लठ्ठपणा आणि मधुमेहाशी चाललेल्या लढय़ात शल्यतज्ज्ञांच्या हाती लागलेला हा अभिनव उपाय, ज्याच्याकडे सर्व वैद्यक व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
डॉ. लीली जोशी – drlilyjoshi@gmail.com
या लेखासाठी विशेष साहाय्य :
डॉ. शशांक शाह एमएस, एफएमएएस, बॅरियाट्रिक सर्जरीतज्ज्ञ, लैपरो ओबेजो सेंटर, पुणे, दूरध्वनी- ०२०-३०२७०६०००, २४३३७०००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 12:55 am

Web Title: what happens during bariatric surgery
Next Stories
1 डायल १०८ फॉर ईएमएस
2 जपून टाक पाऊल..
3 शास्त्र पुनर्रचनेचे
Just Now!
X