एकनाथांचे एक भारूड आहे. ‘प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे’, अशा कानपिचक्या नाथांनी आपल्या त्या भारुडात दिल्या आहेत. सध्या पाहुण्यांना कायमचा आश्रय देण्याची परंपरा सुरू झाल्यामुळे व पाहुण्यांसाठी घरातल्यांनाच बाहेरची वाट दाखविण्याचा सपाटा सुरू झाल्यामुळे, काहीशी तशीच परिस्थिती असलेल्या नाथाभाऊंना हे भारूड आठवणे साहजिकही आहे. शिवाय, नाथाभाऊ ज्या संप्रदायातून राजकारणात दाखल झाले, त्या संघसंप्रदायात त्यागाचे महत्त्वही महान असेच असल्याने, त्यागाचा सन्मान करण्याची परंपरा संघसंप्रदायाच्या साऱ्या वारकऱ्यांच्या अंगी संस्कारित होणे हेदेखील साहजिकच आहे. भले, स्वत:स त्याग करावा लागला तरी चालेल, पण त्यागी माणसाचा यथोचित सन्मान झालाच पाहिजे, असे हा संघसंप्रदाय सांगतो. सद्य:स्थितीत नाथाभाऊंना मातृसंस्थेच्या त्या शिकवणुकीचीही आठवण होत असेल, तर त्यात काही गर नाही. घरात येऊ घातलेल्या त्यागी पाहुण्याच्या सन्मानासाठी त्यांच्या पक्षात सध्या पायघडय़ा अंथरण्याची तयारी सुरू झालीच आहे. नारायणराव राणे नावाचा नवा त्यागी पाहुणा अखेर घरात येणार हे आता स्पष्टच असून त्याच्यासाठी घरात पुरेशी जागा करण्यासाठी नाथाभाऊंना सध्या घराबाहेर राहावे लागत आहे, हे त्यांच्या बेचनीचे कारण! नारायणरावांच्या त्यागाची महती नाथाभाऊंनीच परवा पहिल्यांदा गायिली, म्हणजे नारायणरावांनी केलेल्या त्यागाची ते कदरही करतात. तब्बल १२ वर्षांची त्यागाची तपश्चर्या पूर्ण करून आलेला नारायणराव नावाचा हा पाहुणा आता आपल्या घरात येणार म्हणून सारा परिवार सुखावला असला, तरी या पाहुण्याच्या काठीने विंचू कसा मारावयाचा याचाच खल बहुधा पक्षात सुरू असावा. घरात येऊ घातलेल्या या नव्या पाहुण्याने तर उंबरठा ओलांडण्याआधीच काठी सरसावलेलीच आहे. त्याच्या त्यागाची महती तर एव्हाना सर्वानाच माहितीही झालेली आहे. ज्या शिवसेनेने नारायणरावांना राजकारणात घडविले, त्या शिवसेनेचा त्यांनी क्षणात त्याग केला. पुढे एक तप काँग्रेससोबत राहिले, मंत्रिपद भूषविले, मानमरातबाचे धनी जाहले, त्या काँग्रेसचाही त्यांनी त्याग केला. या त्यागाची महती अशी, की स्वत:चा स्वाभिमानी पक्ष काढताना, काँग्रेससोबत असलेल्या आमदारपुत्राचाही त्यांनी तात्पुरता त्याग केला आणि स्वत:च्या विधान परिषद सदस्यत्वाचाही त्याग केला. राजकारणात त्यागाचे एवढे सातत्य नारायणरावांखेरीज दुसऱ्या कुणीही दाखविलेले नसल्याने, अशा त्यागी नेत्याला सन्मानाने घरात घेणे हे तर संघसंप्रदायाच्या परंपरेशी सुसंगत असेच असताना नाथाभाऊंना त्यात वावगे का वाटावे, हा प्रश्नच फजूल ठरतो. आसपास अस्तनीतील साप, विंचवांचा सुळसुळाट झाल्याचे भासू लागल्यास त्यांच्या बंदोबस्तासाठी पाहुण्याच्या काठीचा वापर करण्याची परंपरा राजकारणात जुनीच असल्याने नारायणरावांसारखा पाहुणा कामास येणार असेल, तर त्यातही नाथाभाऊंना वावगे वाटण्याचे कारणच नाही. पण अशा त्यागी पाहुण्याच्या सोयीसाठी घरातल्यांनाच त्याग करावयाची वेळ येणे चांगले नाही. नाथाभाऊंना त्याची खंत वाटत असावी. ते साहजिकच आहे.