महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे द्रष्टे नेते आहेत. नागपूरमधील यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवसच अगोदर त्यांनी राज्यातील काही देवस्थानांना भेटी देऊन राज्यात भरपूर पाऊस पडू दे, अशी देवाकडे मागणी – (हो, मागणीच.. कारण राज्याचा प्रमुख स्वत:च एवढा मोठा असतो, की या राज्यातील देवा-देवावरही त्याचीच कृपा असावी लागते. देवस्थानांच्या प्रमुखांना त्यांनी राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्यामुळे तर या देवस्थानांची संस्थाने अधिक समृद्ध झाली आहेत. त्यांच्या कृपेशिवाय देवस्थानांचेही नशीब उजळत नसेल, तर अशा देवांकडे त्यांनी प्रार्थना केली, असे केविलवाणे शब्द वापरणे बरे दिसेल काय?) – केल्यामुळे, त्यांच्या कारकीर्दीतील सलग तिसऱ्या वर्षीही महाराष्ट्रात धुवाधार पाऊस कोसळावा आणि पावसाळ्याच्या पहिल्या नक्षत्रापासून सततरीत्या आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या नागपूरकरांच्या डोळ्याचे पारणे नेमके विधिमंडळ अधिवेशनाच्या मुहूर्तावरच फेडण्याएवढय़ा जोमाने वरुणराजाने बरसावे हा काही निव्वळ योगायोग म्हणता येईल काय? यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा द्रष्टेपणाच कारणीभूत आहे, यात तिळमात्र शंका घेण्याचे कारणच नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरास पावसाने झोडपले आणि नद्यानाले व गटारांनादेखील पूर आला, हे बहुधा नागपूरच्या इतिहासातच पहिल्यांदा घडले, असे जाणकारही सांगतात. अशा गोष्टी केवळ योगायोगाने होत नसतात. बरे नुसता पूर येऊन विधिमंडळ कामकाज बंद पडल्याबद्दल विरोधकांना त्यांच्या कर्तव्यदत्त राजकीय भूमिकेनुसार आनंद होणे साहजिकच असले, तरी या पावसाच्या निमित्ताने विधिमंडळाच्या आवारात साचलेली सारी घाण दूर होऊन ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची नागपुरातील पायाभरणी लोकशाहीच्या या पवित्र मंदिराच्या आवारात झाली, हे लक्षात घेण्याऐवजी, गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याचाच बोभाटा अधिक व्हावा, हाच तो छिद्रान्वेषीपणा!.. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुराने आणि अधिवेशनाच्या निमित्ताने तेथे जमा झालेल्या तमाम प्रातिनिधिक महाराष्ट्रास ‘जलयुक्त आवार’ योजनेचे एक थेट प्रात्यक्षिक अनुभवण्यास मिळाले, हादेखील मुख्यमंत्र्यांच्या द्रष्टेपणाचा थेट आविष्कार नव्हे काय? विधान भवनाच्या गटारात दारूच्या बाटल्या सापडल्या, तसे प्लास्टिकच्या पिशव्यांचा अतोनात कचरादेखील तेथे सापडलाच की!  प्लास्टिकमुळे पूरस्थिती ओढवते, हे सेनेचे नेते सातत्याने सांगत असतात व त्यांचे मंत्री त्याचीच री ओढत असतात. त्या दिवशी दिवाकर रावतेही तेच म्हणाले. प्लास्टिकच्या दुष्परिणामांचे जे विदारक दर्शन त्या दिवशी विधिमंडळाच्या जलयुक्त आवारात महाराष्ट्रास घडले, तसेच दर्शन खरे म्हणजे, गटारात तुंबलेल्या दारूच्या बाटल्यांमुळेही घडावयास हवे होते. ते याआधी कधीच घडले नव्हते. दारू पिणे वाईट, असे काही जण म्हणतात. राज्य सरकारलाही दारूमुळे मोठा महसूल मिळत असला, तर हेच सरकार दारूबंदीचाही यथाशक्ती प्रसार करत असते. दारू घातक असते, हे विधान भवनाच्या आवारात तुंबलेल्या गटारातील दारूच्या बाटल्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नसता, तर एवढय़ा महान साक्षात्कारास आपण मुकलो असतो, हे लक्षात घ्यायला हवे..