राजकारणात नैतिकता उरलीच नसल्याचा सूर अलीकडे सर्वत्र उमटू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तर सामान्य मतदारांनाही तसे प्रकर्षांने वाटू लागले होते. या भावनेने ज्यांच्या मनात नैराश्याची भावना बळावली, अशा तमाम जनतेसाठी या घडीची एक महादिलासादायक महाबातमी आहे. ‘राजकारणातील नैतिकता संपली’ असे वाटणे हाच निव्वळ गैरसमज असून, उलट नैतिकतेला आता केवळ राजकारणापुरताच आधार उरला आहे, असे वाटण्यासारखी दिलासादायक परिस्थिती जन्मास येऊ घातली आहे. दिलेला शब्द पाळणे ही नैतिकतेशी सुसंगत अशी मानली जाणारी कृती असल्याचे मानले जाते. मात्र, अलीकडे ही कृती अन्यत्रही अभावानेच आढळत असल्याने राजकारणासारख्या बेभरवशी क्षेत्रात तर तिचा पुरता लोप झाला असावा असे वाटणेही साहजिक होते. पण आता असे झाले आहे की, दिलेला शब्द तंतोतंत पाळणे हे केवळ राजकारणातच प्रामाणिकपणे दिसत आहे.

तसे नसते, तर, एकमेकांशी फारसे सख्य नसलेल्या १६२ त्रिपक्षीय आमदारांनी सोमवारी संध्याकाळी हयात नावाच्या एका हॉटेलच्या प्रांगणात समर्पित वृत्तीने जमा होऊन उजवा हात जमिनीस समांतर ठेवून आपापल्या पक्षश्रेष्ठींशी एकनिष्ठा व्यक्त करणारी शपथ घेतली नसती. शपथेची शक्ती काय असते, याचा प्रत्यय आता लगोलग महाराष्ट्रास आला असेल. शपथेप्रमाणे आचरण करणे हा नैतिकतेचा सर्वोच्च आदर्श. सोमवारी संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या १६२ आमदारांनी शपथ घेतली आणि जेमतेम तीन दिवसांचे फडणवीस सरकार या शपथेच्या शक्तीमुळे गदागदा हलू लागले. शपथेच्या शक्तीचे सावट पुढच्या प्रत्येक दिवसावर दाटलेले राहणार हेही त्या संघटित शपथविधीनंतर लगेचच स्पष्ट झाले होते. विधिमंडळाच्या सदनातील बहुमताच्या शक्तिप्रदर्शनाआधीच शपथपूर्वक सिद्ध झालेले ते बहुमत तीन दिवसांच्या सरकारला संकटात आणणार असे पहिले चिन्ह या शपथविधीत स्पष्टपणे उमटले आणि मैत्रीचा नवा अध्यायही यानिमित्ताने प्रत्यक्षात अवतरल्याचे महाराष्ट्रास पाहावयास मिळाले.

राजकारणात आणि क्रिकेटमध्ये केव्हाही काहीही घडू शकते असे अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलून गेले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेल्या धक्कादायक आणि अनपेक्षित कलाटणीतून राजकारणातील नैतिकतेचे एक उदात्त उदाहरण देशासमोर उभे राहिले आहे यात शंका नाही. शपथपूर्वक व्यक्त केलेल्या भावनांना हरताळ फासण्याची असंख्य उदाहरणे सर्वत्र आढळत असताना, या शपथविधी सोहळ्याने आपले वेगळेपण इतिहासात अढळपणे कोरले. राजकारणाच्या मैदानात शपथेच्या पावित्र्याचा उदात्त आविष्कार महाराष्ट्रास पाहावयास मिळाला. शपथेचे पालन करण्याचा पहिला टप्पा तर तीनही पक्षांच्या आमदारांनी श्रद्धापूर्वक पार पाडला आहे.

‘यापुढे कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तीन पक्षांच्या आघाडीशी मी प्रामाणिक राहीन’ हा या शपथेचा पुढचा टप्पा आहे.

भाजपला मदत होईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही असेही १६२ आमदारांनी शपथपूर्वक स्पष्ट केले आहे. शपथेचे पावित्र्य राखणे ही मोठी कसोटी असते. या कसोटीस शपथपूर्वक सामोरे जाणाऱ्या या आमदारांनी महाराष्ट्रासमोर शपथेची शक्ती नव्याने सिद्ध केली आहे.