रेमडेसिवीरचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी केली होती. या चौकशीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले होते. याच मुद्द्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपा नेत्यांमध्ये वादविवाद सुरू आहे. भाजपाकडून टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला असून, एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे.

ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फैलावर घेतलं होतं. मात्र, आता या कंपनीकडून रेमडेसिवीर औषधांचा साठा करून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. याचा हवाला देत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे.

“ब्रुक फार्मा या कंपनीचं साठेबाजी करणं आणि औषधी काळ्या बाजारात विकणं त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरातमध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारख माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…,” असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पोलिसांच्या कारवाईवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली होती. “आम्ही रेमडेसिवीरचं वाटप केलं तर त्यात काय चुकलं? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवं आहे. लोक वणवण भटकत आहेत. २२ तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कुणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपाचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा,” असं पाटील म्हणाले होते.