महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमान दुरुस्ती केंद्र उभारण्याचा प्रस्तावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाकारल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. विदर्भाकडे मोठ्याप्रमाणात विकास करण्याची संधी आहे मात्र सकारात्मक दुष्टीकोनातून विदर्भाकडे पाहिलं जात नसल्याची खंत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकरांनी नितीन गडकरींसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हा किस्सा सांगितला.

माझी नितीन गडकरींशी एकदा भेट झाली ते नागपूरला असताना. त्यांना मी एव्हिएशन सेंटरसंदर्भात सांगितलं होतं, असं प्रकाश आंबेडकर या मुलाखतीमध्ये म्हणाले. “दुर्देव आहे की राजकारणी वाचत नाही, असं मी त्यांना म्हटलं होतं,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं. नागपूरला असणाऱ्या या हबसंदर्भात केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाने हा प्रकल्प अपयशी ठरेल असं सांगत याला फारसं यश मिळणार नसल्याचं मत व्यक्त केल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.

नक्की वाचा >> …तर मराठवाडा, विदर्भातील कापसाने महाराष्ट्राची गरिबी दूर होऊन बेरोजगारीही कमी झाली असती : प्रकाश आंबेडकर

“एकदा मॉस्कोवरुन विमान निघालं की त्याचा पहिला हॉल्ट हा टोकियो आहे. या विमानांना थांबण्यासाठी मध्ये काहीच नाहीय. म्हणजे बिघाड झाला तर मध्ये उतरण्यासाठी त्याला जागाच नाहीय. अनेक आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांसाठी आपण नागपूरला आपलं केंद्र का बनवू शकत नाही. नागपूर हे दुरुस्ती केंद्र का होऊ शकत नाही? जे मागितलं जातं ते करायचं नाही आणि जे मागितलं नाही त्याच्या मागे लागायचं असं सगळं चालेलं आहे,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी धोरणांसंदर्भात नाराजी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकरांनी हा किस्सा सांगितल्यानंतर, “ही कल्पना नितीनजींनी आनंदाने स्वीकारली असेल”, असं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी म्हटलं. त्यावर “नाही, सांगितलं मी पण ऐकलं नाही ना नितीन गडकरीजींनी. काय करु आता?” असा प्रतीप्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. माझं आजही असं म्हणणं आहे की नागपूरमध्ये जागा देऊन तिथे असं एखादं सेंटर उभारलं तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे, असंही पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नक्की वाचा >> “कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे पण त्याकडे फार दुर्लक्ष झालंय”

विदर्भातील कापूस उद्योगाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रकाश आंबेडकरांनी यावेळी बोलून दाखवली. “कापसाच्या २५ लाख गाठी मराठवाड्याच्या काही जिल्ह्याच्या आणि विदर्भातील काही भागांमध्ये होतात. २५ लाख गाठींसाठी ४५० स्पिनिंग युनीट उभं राहणं गरजेचं आहे. आज त्या भागामध्ये आपल्याला १० स्पिनिंग युनीटसुद्धा दिसत नाहीत. हा पूर्ण विभाग दुर्लक्षित आहे आणि तो नॅशनल वेस्ट (राष्ट्रीय स्तरावर वापरण्यात न आलेला) असल्याचं मी मानतो,” असं  प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला भरपूर मागणी असून आपण उद्योग भारण्यात कमी पडत असल्याची खंतही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली. “आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर कच्च्या तेलाचा व्यापार पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर टेक्सटाइल (वस्त्र उद्योग) आहे. या भागातील शेतकरी कापूस पिकवतो, त्याची गाठ बांधली जाते पण तो परदेशी निघून जातो. त्याचं जर स्पीनिंग झालं असतं तर याची पुढची प्रोसेसिंग महाराष्ट्रात झाली असती. यामुळे सध्या महाराष्ट्रातील तरुण जो बेरोजगार दिसतो तो बेरोजगार दिसला नसता. विदर्भामध्ये खनिजं आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सारख कारखाने आहेत. साखर कारखान्यांचा टर्नओव्ह हा लिमिटेड आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यातील कापसाचं टर्नओव्हर प्रचंड आहे. याच्या माध्यमातून महाराष्ट्राची गरीबी दूर गेली असती. आज आपल्याला जो आर्थिक तुटवडा दिसतोय तो कदाचित आपल्याला या ठिकाणी दिलसा नसता. आपल्याला सरप्लस व्यवस्था उभारता आली असती,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नक्की वाचा >> Coronavirus : आपली परिस्थिती बांगलादेशपेक्षाही वाईट; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे, मोदी सरकारवर निशाणा

अंतुले नसते तर…

कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे. तिथे रासायनिक कारखाने आणण्याचा निर्णय चुकीचा वाटतो. तसेच कोकणाकडे सर्वच राजकारण्यांचं दुर्लक्ष झालं आहे. अंतुले नसते तर आजही डोंगर तुडवत कोकणात जावं लागलं असतं आणि मधू दंडवते नसते तर रेल्वे कधी कोकणात पोहचली नसती, असं मत कोकणासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> करोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर का करत नाही?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

“कोकण हे ऑक्सिजन सेंटर आहे. ;चिपळूण, महाड आणि पेणला जो केमिकल झोन आणला तो अत्यंत चुकीचा भाग आहे असं मी मनतो. सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर असणाऱ्या कोकणमध्ये ऑक्सिजन टुरिझम कसं डेव्हलप करता येईल हे पाहण्याऐवजी तिथे रासायनिक कारखाने आणता आणि तिथं ऑक्सिजन कसा संपेल हे बघता. त्यावेळेस अशा निर्णयांना मी शिळेपणा असं म्हणतो,” असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. इकलॉजीचा विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने कोकणाचा विकास केला पाहिजे. मात्र असं होताना दिसत नसल्याची खंत प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली.