‘टूलकिट’प्रकरणावरून राजकारण चांगलचं पेटलं आहे. काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’बाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रसृत केलेल्या संदेशाला ट्विटरने ‘फेरफार’ प्रकारात वर्गीकृत केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी पत्र पाठवले होते. सोमवारी पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टूलकिट प्रकरणावर सत्य घाबरत नाही, असे ट्विट केले आहे.
‘कोविड टूलकिट’ प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीच्या विशेष शाखेचे पोलीस सोमवारी ‘ट्विटर इंडिया’च्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयांत धडकले. ‘टूलकिट’प्रकरणी ट्विटरला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र दिल्ली पोलिसांचे पथक ट्विटर इंडियाच्या कार्यालयात पोहचल्यानंतर मागील वर्षभराहून अधिक काळापासून वर्क फ्रॉम होम असल्याने कार्यालयात कोणीच नसल्याचं त्यांना प्रवेशद्वारावरच सांगण्यात आलं. आता याचाच व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
Truth remains unafraid.
सत्य डरता नहीं।#Toolkit
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2021
काँग्रेस म्हणते समाजमाध्यमांना भाजपा घाबरलं
‘‘आम्ही ट्विटरला पत्र दिले होते. ट्विटरकडे टूलकिटबाबतची कोणती माहिती आहे आणि त्यांनी त्याबाबतच्या संदेशाला फेरफार प्रकारात का टाकले, हे आम्हाला जाणून घ्यायचे होते’’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. करोनास्थिती हाताळणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे ‘टूलकिट’ कॉंग्रेसने तयार केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, त्यात तथ्य नसून, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती. दरम्यान, समाजमाध्यमांच्या ताकदीला सरकार घाबरले आहे. त्यामुळे सरकार कट-कारस्थान रचत आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
काय आहे प्रकरण
संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी काँग्रेस पक्ष एका टूलकिटद्वारे करोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. संबित पात्रा यांनी दावा केला होता काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे. या ट्विटमध्ये एक पत्रक देखील देण्यात आलं होतं. ज्यावर काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर सोशल मीडियावर कशा प्रकारचे ट्विट करायचे आहेत आणि कोणती माहिती वापरायची याबद्दल माहिती होती.