News Flash

प्रसंगनिहाय शिक्षण द्यायला हवं

जेवण झाल्यावर तो कागद मी सावकाशीने उघडला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘आता तरी बोलायला हवंच’ हा डॉ. शशांक सामक यांचा १५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला लेख आवडला.  डॉ. सामक यांनी केलेल्या लैंगिक शिक्षणाविषयीच्या मांडणीला शिक्षक म्हणून आलेला माझा एक अनुभव जोडावा म्हणून ही प्रतिक्रिया. त्यावर्षी माझ्याकडे सातवीचा वर्ग होता. एके दिवशी मधल्या सुट्टीत आम्ही शाळेच्या कार्यालयात जेवण करत असताना दोन धिटुकल्या मुली धावतच आल्या. मला बाजूला बोलावत कागदाची एक चिटोरी लपवत माझ्याकडे दिली व म्हणाल्या, ‘‘गुरुजी, हे कुणीतरी लिहिलंय, आपल्या वर्गात सापडलंय.’’

जेवण झाल्यावर तो कागद मी सावकाशीने उघडला. तर त्यामध्ये मानवी शरीर अवयवांची बोली भाषेतली नावे होती. सहज प्रतिक्रिया काय येतात पहाव्यात म्हणून मी तो कागद सहकारी शिक्षक-शिक्षिकांना वाचायला दिला वा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळू लागलो. काहींनी चेहऱ्यावर रागाचा मुलामा चढवला, काहींनी ‘सातवीत आले की शिंगे फुटतात’ अशा स्वरूपाच्या मोघम प्रतिक्रिया दिल्या, एकाने तर ‘हल्ली पिढी कशी बिघडायला लागलीय’ यावर छोटेखानी भाषण ठोकलं. शिक्षिकांनी माना खाली घातल्या ( ‘स्त्री’ म्हणून अशा प्रसंगी प्रतिक्रिया देणंही जणू चुकीचं! ) एकाने  सगळा दोष पालकांना दिला. कारण शाळेत असं काही आपण शिकवत नाही. मग ही शिकतात घरी व समाजातच ना, हे तर्कशास्त्र मांडलं. मुख्याध्यापक महाशयांनी सल्ला दिला की, ‘‘सर तुम्ही आत्ताच्या आता सगळ्यांची अक्षरे चेक करा व हा ‘गुन्हेगार’ शोधा आपण त्याच्या पालकांना बोलावून पाल्याला शाळेतून काढून टाकण्याची ताकीद देऊ .’’

सुट्टीनंतर मी वर्गात गेलो. एव्हाना वर्गातही गंभीर वातावरण झाले होते. मी ती चिटोरी थेट पहिल्या रांगेतील मुलाजवळ दिली व वाचून पुढे द्यायला सांगितली व मुलांच्याही चेहऱ्यावरील भाव न्याहाळू लागलो. सगळ्यांनी वाचून झाल्यावर यावर काय करावे असा पेच मुलांसमोर ठेवला. मुलांच्या चेहऱ्यावरील भाव आणि प्रतिक्रिया व ऑफिसमध्ये मिळालेल्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया सारख्याच होत्या. मी तडक उठलो आणि फळ्यावर दोन रकाने तयार केले. या रकान्यात एका बाजूला ‘दगड’ असं लिहिलं व त्याच्यासमोरच दुसऱ्या बाजूला ‘दगूड’ असं लिहिलं. त्याचप्रमाणे ‘ट्रक’- ‘टरक’ , ‘हातोडी’ – ‘हातुडा’ असे शब्द लिहिले.

नंतर खाली ‘योनी’, ‘लिंग’ ‘गुदद्वार’ हे शब्द लिहिले व त्यापुढील जागा रिकाम्या ठेवल्या व मुलांशी संवाद साधला. ‘योनी’, ‘लिंग’ ‘गुदद्वार’ हे  प्रमाणित भाषेतील शब्द त्यांनी अनेकदा ऐकल्याचं सांगितलं. पण या तीनही शब्दांसमोर रिकाम्या जागेत बोली भाषेतील समानार्थी काय  असतील हे तुम्हाला माहीत आहे. कारण हेच शब्द त्या चिटोरीत आहेत असे सांगितले. नंतर विद्यार्थ्यांनी विचारले की, ही ‘दगड’ ऐवजी ‘दगूड’ किंवा ‘हातोडी’ ऐवजी ‘हातुडा’ असं आपल्या गावाकडच्या भाषेत बोलले / लिहिले तर त्यात काहीच चुकीचे नाही तर या चिटोरीत लिहिलेले शब्द हे देखील गावाकडच्याच भाषेतील आहेत व त्यात काय चूक आहे. आपण सिनेमागृहे, सार्वजनिक मुताऱ्या, संडास यांच्या दारावर भिंतींवर तर असे समानार्थी शब्द पाहतो, अवयवांची काही चित्रे पाहतो जी चित्रे पुस्तकातही असतात. त्याचा तुम्हाला पुढे सखोल अभ्यासही करायचा आहे.

मग आत्ता सांगा, हे लिहिणारा जो कोणी असेल त्याला शिक्षा करणे योग्य आहे का? यावर क्षणात वातावरण मोकळे झाले. विद्यार्थी दडपणातून अभ्यासात, जिज्ञासेत आली. कुतूहलाने असेच आणखी काही प्रश्न विचारू लागली. डॉ. सामक यांच्या लेखाचा धागा पकडून सांगावंसं वाटतं, लैंगिक शिक्षणाचा बाऊ  न करता विद्यार्थ्यांना प्रसंगनिहाय जमेल तसं शिक्षण देण्यास आपापल्या पातळीवर प्रत्येकाने सुरुवात करायला हवी.

योगेशकुमार भांगे, सोलापूर

 

आता हे थांबणं अवघड आहे

‘आता तरी बोलायला हवंच’ हा डॉ शशांक सामक यांचा १५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. ज्यांनी १९६० मधल्या ‘अमेरिकन सेक्शुअल रेव्होल्यूशन’चा इतिहास वाचला आहे त्यांना लेखात सांगितलेल्या गोष्टींबद्दल विशेष नवल वाटणार नाही. तिथे स्त्रीनेच नियंत्रण करणारी गर्भनियोजन करणारी गोळी बाजारात आली, तेव्हा जुन्या संभोग विषयाच्या भीतीचे उच्चाटन झाले. सध्या आपल्याकडे ती क्रांती आली आहे. आज २०१७ चा काळ तर वाह्य़ात वागण्यासाठी भरपूर सुपीक आहे. मोकळीक, पॉर्न, मोबाइलचा अमर्याद वापर, दूरचित्रवाणी, गर्भपाताची सोय, पैशांची उपलब्धता, पालकांची ढिसाळ शिस्त. आता हे थांबणे अवघड आहे. त्यासाठी मुलगी नाही मिळाली तर सामूहिक बलात्कार करायचे धाडस आलेले आहेच.

किसन गाडे, पुणे. 

 

..तेच ध्येयापर्यंत पोहोचतात

‘संपूर्ण सक्षमीकरणाकडे’ हा डॉ. मेधा पुरव सामंत यांचा १५ जुलैला प्रसिद्ध झालेला प्रदीर्घ लेख म्हणजे मी, ते, आम्ही असा रोमांचकारी प्रवास, फारच हृदयस्पर्शी वाटला. कोणतीही संस्था सुरू करताना लहान असते, अनेक अडचणी येतात, जे अडचणीतून मार्ग काढतात तेच आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतात. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबा आमटे यांचे ‘आनंदवन.’ मेधाताईंचा प्रवास देखील खडतर होता, सुरुवातीला बरेच वाईट, कटू अनुभव देखील आले. पण त्या विचलित न होता, जे येतील त्यांच्याबरोबरीने पुढे निघाल्या आणि छोटय़ा रोपटय़ाचे वटवृक्षात कधी रूपांतर झाले हे त्यांना देखील समजले नाही. मेधाताईंनी हजारो महिलांच्या संसारात अक्षरश: नंदनवन फुलवले. तीच पिढी नव्हे तर पुढच्या दोन-तीन पिढय़ांचे जीवन सुखकर केले. मेधाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल सलाम.

शिल्पा पुरंदरे, वेसावे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 12:40 am

Web Title: loksatta chaturang reader response 2
Next Stories
1 मार्गदर्शन करणारा भावनात्मक लेख
2 गुण वाढताहेत पण गुणवत्तेचे काय?
3 आठवणी ताज्या झाल्या
Just Now!
X