‘महिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा’ हा ६ जानेवारीचा लेख वाचला अतिशय उत्तम आहे. त्यात आरक्षणाला २५ वर्षे झाली तरी स्त्रियांना मिळालेल्या आरक्षणाचा उपयोग लेखात उल्लेख केलेल्या व्यवस्थांनी स्वत:चे हित साध्य करण्यासाठी केल्याचे परिणाम लेखात सविस्तर मांडले आहेत व उद्देशानुसार पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण तसे होण्यासाठी निवडणूक आयोगाने काळजी घ्यावयास हवी. खरं तर त्यासाठी योग्य अशी सुधारणा करावी ती अशी की, कोणत्याही पदासाठी महिला आरक्षण जाहीर होईल तेव्हा त्या पदावरील पुरुषाच्या किंवा राजकारणात कार्यरत असलेल्या पुरुषांच्या कुटुंबातील व्यक्तीला प्रथम पदार्पणात थेट आरक्षित पदासाठी उमेदवारी मिळू शकणार नाही, अशी तरतूद व्हावी. आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच काही होऊ शकेल. पण ते निवडणूक आयोग करू शकेल? कारण आचारसंहितेचा भंग, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणारे उमेदवार यांच्यावर आतापर्यंत निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? हे समजलेले नाही.

– मनोहर तारे, पुणे

 

नवी दृष्टी मिळाली

आजच्या ‘लाइफ इज ब्यूटिफुल’ या सदरातील ‘ज्याचा त्याचा कोपरा’ हा लेख खरोखरीच ब्यूटिफुल. आजपर्यंत ‘ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता विचारू नये हा मध्यमवर्गीय संकेत पाळत आले. कधीमधी आपल्या कोपऱ्यातून बाहेर डोकावले तर अपराधी वाटायचं. पण त्यांनी हे अफाट सुंदर, विविधतेने नटलेलं जग पाहण्याची संधी गमावली याचं वाईट वाटलं, जाणवलं. त्या जपानी अधिकाऱ्याचे निरीक्षण व निष्कर्ष किती सखोल, विचारी. लेख वाचून माहिती मिळाली व नवी दृष्टीही.

– प्रभा देशमुख

 

लेखमालेचे स्वागत

नवीन वर्षांतील डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या ‘संहिता साठोत्तरी’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा लेखमालेचे स्वागत. आतापर्यंत या विषयाचा विचार कोणत्याही समाज घटकाने वयोगटाने नातलगांनी राजकारण्यांनी केला नव्हता. एवढेच काय स्वत: ज्येष्ठांनीसुद्धा केलेला नसेल. या लेखमालेमुळे नक्कीच सगळे विचार करायला लागतील. असा प्रेरणादायक उपक्रम सुरू केल्याबद्दल कौतुक आणि पुन्हा एकदा धन्यवाद.

– डॉ. उज्ज्वला तरकसबंद

 

ज्याचा त्याचा कोपरा भावला

प्रतिमा कुलकर्णी यांचा ‘ज्याचा त्याचा कोपरा’ वाचला न् चांगलाच भावला. जपानी लोक आपल्या कर्मचाऱ्यांचा केवढा विचार करतात ना! आपल्यालाही हवंच असतं की असं तिसऱ्या व्यक्तीशी बोलून मोकळं व्हायला. पण ते मार्ग आपण आपलेच शोधतो. निसर्गाने पक्षी- प्राण्यांनाही कक्षा ठरवून दिल्या आहेत हे माहीत नव्हतं पण का कुणास ठाऊक मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात बरं वाटलं. आवडेल तुम्हाला दर शनिवारी भेटायला आणि हे आयुष्य अधिक सुंदर करायला.

– यशदा नाईक, मुंबई</strong>

 

लेख मनापासून पटला..

‘महिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा’ हा ६ जानेवारीचा लेख वाचला. मनापासून पटला.. खरोखरच असेच होत असते.. पुरुष आपले अधिकार सोडत नाहीत आणि फक्त पत्नीला महिला आरक्षणाच्या नावाखाली मूळ सत्ता आपल्याकडे ठेवतात. शेवटी काय स्त्रियांना त्यांना त्यांच्याप्रमाणे काम करता येतही नाही आणि नेहमीच रबर स्टॅम्पसारखं काम करायचं.

सर्व स्त्रिया अशा नसतात परंतु बहुतेकींना त्यांच्या मर्जीनुसार काम करता येत नाही. महिला आरक्षण हे फक्त नावापुरतं आहे.. आर्थिक नुकसानभरपाई कोणीच देत नाही, जरी तुम्हाला सामाजिक काम करायची आवड असली तरी तुम्हाला तुमच्या मनासारखं काम करता येत नाही हे एक फार मोठे दुर्दैव आहे. सरकारला या अनुषंगाने गांभीर्याने चर्चा करणे आवश्यक आहे.

– अजित भोसले

 

चतुरपणे केलेली रंगांची उधळण!

मी ‘लोकसत्ता’ची फार पूर्वीपासूनच वाचक आहे. त्यातही ‘चतुरंग’ पुरवणी एका दमात वाचून काढायची असा माझा पहिल्यापासूनचा शिरस्ता आहे. त्यातले निरनिराळ्या विषयांवरचे लेख वाचायला खूप मजा येते. गेल्या वर्षीची सदरे चांगलीच होती, पण त्याहूनही या वर्षीची सुरुवातीपासूनची सदरे मला जास्त आवडली. त्यातही ‘अपूर्णाक’ हे सदर वाचून मन हेलावले! अशी समजूतदार पालक मंडळी विरळाच! मी अशी काही मंडळी पाहिली आहेत की स्वत:च्या मुलातील कमतरता समजूनही ती ते मान्य करायला तयार होत नाहीत आणि त्यासाठी जे कष्ट घ्यायला हवेत तेही घेण्याची त्यांची तयारी नसते, किंबहुना तेवढे त्याचे महत्त्वच त्यांना वाटत नाही. पण त्याचा परिणाम ती मुले थोडी मोठी झाल्यावर जाणवू लागतो आणि तेव्हा उशीर झालेला असतो.

‘लाइफ इज ब्यूटिफुल’ हे सदरही असेच आकर्षक आहे. प्रतिमा कुलकर्णी या माझ्या पहिल्यापासूनच आवडत्या दिग्दर्शिका आहेत. ‘ती आणि मी’ हे सदरही मला भावले. एकंदरीतच ‘चतुरंग’ म्हणजे चतुरपणे केलेली रंगांची उधळण!

– पद्मजा साठे

 

..त्या माणसाची गोष्ट कळली

६ जानेवारीच्या पुरवणीमधील ‘श्रेयस आणि प्रेयस’ या सदरात राजन खान यांचं अंतरंग वाचायला मिळाले आणि पुन्हा एकदा या जगात माणुसकी आणि मानवीपण आणि त्याचं अस्तित्व जपणाऱ्या  आणि इतरांना खऱ्या अर्थानं माणुसकी शिकवणाऱ्या त्या माणसाची गोष्ट कळली.

– शेख रफीक