आषाढी एकादशीला पंढरपुरातील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहू येथून शुक्रवारी (दि. १६) प्रस्थान केले. टाळ-मृदंग आणि तुकोबांच्या नामघोषाने देहूनगरी दुमदुमली असून, पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि वारकरी दाखल झाले आहेत. दुपारी चारच्या सुमारास पालखीने प्रस्थान केले. तत्पूर्वी, सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मुख्य मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या १४ टाळकरी प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले.

दरम्यान, तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानासाठी देहू देवस्थानच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रस्थानाचा सोहळा पहाटेपासूनच सुरू करण्यात आला होता. त्यात पहाटे साडेचारला मुख्य देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानच्या वतीने महापूजा झाली. त्यानंतर इतर विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता भजनी मंडळपात संभाजी महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बाराच्या सुमारास इनामदारवाड्यातून तुकोबांच्या पादुका देऊळवाड्यात आणण्यात आल्या. दुपारी दोनच्या सुमारास देऊळवाड्यातील भजनी मंडपात मुख्य प्रस्थान सोहळा सुरू झाला. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाळा भेगडे उपस्थित होते.

तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतच असणार आहे. १७ जूनला पालखी आकुर्डी येथील मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. या दिवशी आळंदीत माउलींच्या पालखीचा सोहळा होणार आहे. तुकोबांच्या पालखीचे आगमन संगमवाडीतील पुलावरून होईल.