वसई : वसईतील ऐतिहासिक वसई किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून चित्रीकरणासाठी गेलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकाने अडविल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादाची चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या चित्रफितीवर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
वसई पश्चिमेला वसई किल्ला आहे. मुंबईपासून काही अंतरावर हा किल्ला असल्यामुळे शनिवार – रविवार तसेच इतर सुट्टीच्या दिवसात मुंबई, पालघर, ठाणे अशा विविध ठिकाणांहून या किल्ल्यावर पर्यटक येत असतात. तर, प्री- वेडिंग शूट, चित्रपटांचे चित्रीकरण तसेच रील शूटिंगसाठीही या किल्ल्यावर लोकांची मोठी गर्दी असते.
दिवाळीच्या निमित्ताने बुधवारी सकाळी असाच एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्रीकरणासाठी वसई किल्ल्यावर गेला होता. पण, तेथील सुरक्षारक्षकांनी त्याला अडवत चित्रीकरण करण्यास मनाई केली.
यावर संताप व्यक्त करत चित्रीकरणासाठी आलेल्या तरुणाने उपस्थित सुरक्षा रक्षकांना मराठी येत नसल्याची बाब लक्षात आणून देत त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या किल्ल्यावर येणारी प्रेमयुगलं, प्री-वेडिंग शूट, नृत्य चित्रीकरण आणि धांगडधिंगा घालणाऱ्या तरुणाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्रीकरण करणाऱ्याला अडविले जाते असा आरोपही या तरुणाने केला आहे.
सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या या चित्रफितीवर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी तरुणाने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी किल्ल्याची सुरक्षा आणि पुरातत्व खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.