वसई : मोबाईल चोरणार्‍या एका महिलेला रंगेहाथ पकडून दिल्यानंतरही आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तिला सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दुसर्‍या दिवशी गुन्हा दाखल केला आहे.

वसईच्या एव्हरशाईन येथे राहणार्‍या सरिता बनकोटी (४४) ही महिला शनिवारी संध्याकाली आठवडा बाजारात गेली होती. त्यावेळी कुणीतरी गर्दीचा फायदा घेत त्यांचा मोबाईल चोरला. याबाबत तक्रार करण्यासाठी त्या आचोळे पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र तेथे असलेल्या पोलिसांनी ऑनलाईन तक्रार करा असे सांगून परत पाठवले. दरम्यान, काही वेळातच एका महिलेला विरारच्या मनवेलपाडा येथे नागरिकांनी मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडले. याच महिलेने वसईत सरिता बनकोटी यांचा मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांनी त्या चोर महिलेची विचारपूस केली असता तिचे नाव सोनम सोनी (२६) असल्याचे समजले. तिच्याकडून चोरलेले ४ मोबाईल आढळून आले. आरोपी महिलेला घेऊन नागरिक मनवेल पाडा चौकीत गेले.

आणखी वाचा- नववर्षाच्या स्वागतासाठी वसई सज्ज, रिसॉर्ट, हॉटेल, फार्महाऊस फुल

पोलिसांनी हलर्गजीपणा केल्याचा आरोप

मनवेल पाडा पोलिसांनी पहिला गुन्हा नालासोपार्‍यात घडल्याने आरोपी महिलेला आचोळे पोलीस ठाण्यात घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर नागरिकांनी रिक्षातून चोर महिलेला आचोळे पोलीस ठाण्यात आणले. तेथे असलेल्या पोलिसांनी आता संध्याकाळचे ६ वाजले आहेत. तुम्ही या आरोपी महिलेला उद्या पोलीस ठाण्यात घेऊन या असे सांगितल्याचा आऱोपी तक्रारदार महिलांनी केला आहे. आमची तक्रार न घेताच पोलिसांनी चोर महिलेला सोडून दिले ती आरामात पोलीस ठाण्यातून ‘फरार’ झाली, असे या तक्रारदार महिला जयश्री लांडगे यांनी सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार दिली. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि रविवारी दुपारी महिलेची तक्रार दाखल करून चोरीचा गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने पोलिसांचा कडक बंदोबस्त, राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी आरोप फेटाळले…

पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहे. मी रजेवर होतो. परंतु पहिल्यांचा तक्रारदार महिला आमच्याकडे मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार घेऊन आली होती म्हणून तिला आमच्या पोलिसांनी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सांगितले होते असे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजिककुमार पवार यांनी सांगितले. जेव्हा आरोपी महिलेलाला पोलीस ठाण्यात आणले तेव्हा नागरिकांनी तक्रार उद्या देऊ असे सांगितले होते. त्यामुळे तक्रार दाखल केली नव्हती. मात्र दुसर्‍या दिवशी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, असे पवार यांनी सांगितले. चोरीच्या गुन्ह्यात लगेच अटक न करता आधी नोटीस दिली जाते असेही त्यांनी सांगितले.