वसई :- दिवाळीच्या तोंडावर वसई विरार मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र चिंचोटी वाहतूक शाखा तयार करण्यात आली होती. मात्र वाहतुकीचे योग्य ते नियोजन होत नसल्याने अवघ्या नऊ महिन्यातच ही बरखास्त करण्यात आली आहे. तसे आदेश पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिले आहे.
वसई विरार व मीरा भाईंदर शहराच्या पूर्वेकडील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. दहिसर चेक नाका ते विरार शीरसाड फाटा २७.५० किलोमीटर ही चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिसांची हद्द आहे. त्या ठिकाणी सुरवातीला चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस यांच्या मार्फत वाहतूक नियंत्रण केले जात होते. मात्र मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर हा महामार्ग आयुक्तालयाच्या अंतर्गत येत आहे.
सुरवातीला महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या समन्वय साधला जात नव्हता. त्यामुळे महामार्गाची हद्द वर्ग करण्यासाठी आयुक्तलयाने गृह विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार हे केंद्र आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आले. जानेवारी २०२५ मध्ये महामार्गावरील वाहतूक नियंत्रण करणे सोपे जावे यासाठी स्वतंत्र चिंचोटी वाहतूक शाखा तयार करण्यात आली होती.
ही शाखा तयार झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन, वाहनचालकांना शिस्त लागेल असे वाटले होते. परंतु योग्य ते नियोजन होत नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या कोंडीचा मोठा त्रास नागरिकांना ही सहन करावा लागत आहे. नुकताच चार दिवस झालेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. वाहतुकीचे योग्य ते नियोजन होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवू लागली असल्याचा आरोप ही नागरकांमधून करण्यात येत होता.
तर विरुद्ध दिशेने जाणारी वाहने यावर ही कोणतेच नियंत्रण नसल्याने अपघाताच्या घटना ही घडत होत्या.याबाबत नागरिकांच्या तक्रारी ही वाढल्या होत्या. अखेर महामार्गाचे नियोजन व पर्यवेक्षण योग्यरित्या व्हावे यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी वाहतूक विभागात तातडीने मोठे फेरबदल केले आहेत. महामार्गावर असलेली चिंचोटी वाहतूक शाखा बंद करण्यात आली आहे. या अखत्यारीत येत असलेले कार्यक्षेत्र व मनुष्यबळ हे वसई आणि विरार वाहतूक शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
वाहतूक पर्यवेक्षणासाठी दोन सहायक पोलीस आयुक्त
वसई , भाईंदर परिसरात परराज्यातून दिवसेंदिवस वाढत जाणारी मालवहातुक करणारी अवजड वाहनांची संख्या, स्थानिक रहिवाशांची वाढत गेलेली वाहनांची संख्या, रस्त्यांची दुर्दशा यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. सुरवातीला चारही वाहतूक शाखेवर पर्यवेक्षण करण्यासाठी एकच सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी होता. आता दोन सहायक पोलीस आयुक्त नियुक्त केले जाणार आहेत. व एक पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत वाहतूक नियोजन केले जाणार आहे.
वाहतूक शाखेच्या नावात फेरबदल
पोलीस आयुक्तालयात काशिमिरा वहातुक शाखा या शाखेस यापुढे “वाहतुक शाखा-१ (मिरा-भाईंदर) ” या नावाने ओळखली जाईल तर वसई वाहतूक शाखा ही वाहतूक शाखा २ (वसई ) आणि विरार वाहतूक शाखा ही वाहतूक शाखा ३ (विरार) या नावाने ओळखली जाणार आहे.
