वसई-विरार महापालिकेने मृत्यू लपवल्याचा आरोप

विरार : करोना वैश्विक महामारीने मृत पावलेल्या रुग्णाच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत दिली जाणार असल्याचे शासनाकडून घोषित केले आहे; परंतु ही मदत प्रक्रिया मोठी गोंधळाची ठरणार आहे, कारण करोनाकाळात हजारो मृतांचे आकडे पालिकेने लपविले आहेत, असे आरोप होत आहेत.   अनेकांच्या मृत्यू अहवालात संशयित करोना मृत्यू अथवा फुप्फुसाचे आजार, श्वसनाचे आजार असे नमूद केले आहे. त्यामुळे असे हजारो मृतांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाकडून करोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर आणि पालिका स्तरावर तक्रार निवारण समिती निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. यात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, पालिका अतिरिक्त आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असणार आहे.  समिती नागरिकांच्या तक्रारी सोडवून त्यांना मदत मिळण्यासाठी सहकार्य करणार आहेत; परंतु पालिकेने करोनाकाळात अनेकांच्या मृत्यूचे आकडे लपवले आहेत, त्यात अनेक रुग्णालयांनी नमुना क्रमांक ४ च्या अहवालात संशयित करोना मृत्यू  तर काही रुग्णालयांनी श्वसनाचे आणि फुप्फुसाचे आजार, इतर हृदयविकाराची कारणे दिली आहे.   पालिकेकडून देण्यात आलेल्या मृत्यू दाखल्यातसुद्धा असेच उल्लेख  आहेत. अनेकांचे घरातच मृत्यू झाले आहेत,  तर काहींनी आरटीपीसीआर चाचणी न करता प्रतिजन्य चाचण्या केल्या आहेत. त्यातील सकारात्मक अहवालानुसार उपचार केले आहेत. यामुळे त्याचे अहवाल ग्राह्य धरले जाणार का? असे अनेक प्रश्न  आहेत.

दाखल्यात मृत्यूचे कारणच नाही

करोनाकाळात पालिकेने करोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेल्या मृत्यू दाखल्यात मृत्यूचे कारणच दिले नाही. यामुळे जर मृत्यू दाखल्यात मृत्यूचे कारण आणि करोनाचा उल्लेख नसेल, तर रुग्णाचा मृत्यू करोनाने झाला हे कसे सिद्ध करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेने दिलेल्या हजारो दाखल्यांत मृत्यूचे कारण नाही आणि नमुना क्रमांक ४च्या अर्जात केवळ संशयास्पद करोना मृत्यू म्हटले आहे.

पालिकेची लपवाछपवी

करोनाच्या दुसऱ्या लाटेत पालिकेने मृत्यूच्या आकड्यांची मोठी लपवाछपवी केली आहे. माहितीनुसार केवळ जानेवारी ते जूनपर्यंत पालिका स्मशानातील अहवालानुसार दोन हजार २५७ मृत्यू झाले होते; पण पालिकेने केवळ ५८६ मृत्यू झाल्याचे दाखविले, तर जुलै महिन्यापासून शासनाचे निर्देश असल्याचे सांगत मृत्यूची आकडेवारी देणे बंद केले होते. तर आतापर्यंत केवळ १९४९ मृत्यू झाल्याचे पालिकेने सांगितले आहे.  यामुळे पालिकेच्या भूमिकेवर गडद संशय निर्माण होत आहे.

योजना ही प्राथमिक स्तरावर आहे, शासकीय निदेशानुसार समिती निर्माण करण्याचे काम सुरू आहे,  करोना मृत रुग्णांच्या कुटुंबीयांना याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा आणि पालिका स्तरावरील समिती तक्रारी निवारण करण्याचे काम करणार आहे. शासनाकडून अधिक सूचनेनुसार आखणी केली जाईल. – किरण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर