नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या नव्या उड्डाणपूलाचे आज (रविवार) शिवसेनेतर्फे स्व. धर्माजी पाटील असे बेकायदेशीरपणे नामकरण करण्यात आले. या पूलाचे कुठलेही अधिकृत नाव ठरले नसताना, कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी नसताना एमएमआरडीए व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा कार्यक्रम पार पडला. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण तर्फे नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल तयार केला आहे. ९ वर्ष या उड्डाणपूलाचे काम रखडले होते. हा पूल सुरूवातीपासून वादात सापडला होता. पूल तयार होऊन सुद्धा त्याचे उद्घाटन करण्यात आले नव्हते. तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्यासाठी उद्घाटन थांबवून ठेवले होते. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी या पुलाचे उद्घाटन केले होते. मात्र अद्यापही या पुलाचे अधिकृतपणे उद्घाटन झालेले नव्हते. त्यानंतर पुलाच्या नामांतराचा वाद निर्माण झाला होता.

गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते –

शिवसेने तर्फे या पुलासाठी स्व. धर्माजी पाटील काँग्रेस पक्षातर्फे मायकल फुट्यार्डो, तर भारतीय जनता पार्टी तर्फे स्व. खासदार चिंतामण वनगा यांच्यासह इतर सामाजिक संस्थांनीही विविध नावांची मागणी केली होती. दरम्यान, शिवसेनेने(रविवनार) आज या उड्डाणपुलाला स्थानिक नेते धर्माजी पाटील यांचे नाव देण्याचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. काहीही झाले तरी चालेल परंतु पुलाला स्व. धर्माजी पाटील यांचे नाव लागले पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र हे नामकरण बेकायदेशीर असून त्याला कसलीच परवानगी नव्हती. असा कार्यक्रम झाल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र तरी देखील आज सकाळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी स्व. धर्माजी पाटील असे या पुलाचे नामकरण केले. पुलाच्या दोन्ही बाजूस धर्माजी पाटील यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणतीही शासकीय परवानगी नसतानाही शिवसेनेने पोलीस व एमएमआरडीए यांच्या नाकावर टिच्चून नामांतराचा कार्यक्रम उरकला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. याशिवाय कार्यक्रमादरम्यान नायगाव उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूस काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागले आहे.